शस्त्राचा धाक दाखवून लुटले, एलसीबीने तिघांच्या आवळल्या मुसक्या

महा पोलीस न्यूज | १६ जून २०२४ | जळगाव शहरापासून जवळच असलेल्या आसोदा गावात असलेल्या ग्रामपंचायतीजवळ एकाला धारदार शस्त्राचा धाक दाखवून खिशातील ३ हजार रुपयांची रोकड जबरी हिसकावून चोरून नेल्याची घटना शुक्रवार दि.१४ जून रोजी सायंकाळी ६ वाजता घडली होती. याप्रकरणी जळगाव एलसीबीने ३ जणांना असोदा शिवारातून अटक केली आहे.
वैभव विजय सपकाळे (कोळी), कल्पेश निलेश इंगळे (माळी) व दिपक पुंडलिक उर्फ धनराज सपकाळे (कोळी) (तिघे रा. असोदा ता.जळगाव) असे अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. वाल्मीक अंकात बिऱ्हाडे (वय ७२, भोळे नगर, असोदा) यांनी फिर्याद दिल्यानुसार दि.१४ जून रोजी सायंकाळी ६ वाजता ते असोदा ग्रामपंचायत जवळ बसले होते. तेव्हा गावातील वैभव विजय सपकाळे (कोळी) हा मोटार सायकलवर वाल्मीक यांच्याजवळ आला. त्याच्यासोबत मोटार सायकलवर गावातील कल्पेश निलेश इंगळे (माळी) व दिपक पुंडलिक उर्फ धनराज सपकाळे (कोळी) असे मागे बसलेले होते.
वैभव विजय सपकाळे याने वाल्मीक यांना १ हजार रुपयाची मागणी केली. तेव्हा वाल्मीक यांनी माझ्याकडे पैसे नसल्याचे सांगितले. त्याचा राग आल्याने कल्पेश निलेश इंगळे (माळी) याने त्याचे पॅन्टच्या कमरेला लपवुन ठेवलेले एक काही तरी मोठे धारधार हत्यार काढले व वाल्मीक यांच्या मानेला लावले आणि शिवीगाळ करून धमकी दिली. तेव्हा वैभव विजय सपकाळे याने वाल्मीक यांच्या खिशातून ३ हजार रुपयांची रोकड हिसकावली.
घटनेनंतर गावात मोठी खळबळ उडाली होती. संशयितांनी पिस्तुल काढल्याची देखील चर्चा होत होती. याप्रकरणी वाल्मीक बिर्हाडे यांनी जळगाव तालुका पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी वैभव विजय सपकाळे (कोळी), कल्पेश निलेश इंगळे (माळी) व दिपक पुंडलिक सपकाळे (कोळी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पथकाने केली कामगिरी
संपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्र्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजेश मेढे, जितेंद्र पाटील, बबन पाटील, भरत पाटील आदींनी केली आहे.