OtherSocial

जावयाच्या मृत्यूच्या धक्क्याने सासूचीही प्राणज्योत मालवली!

जावयाचा अंत्यविधी सुरू असतानाच सासूचे निधन; जळगावात कुटुंबावर दुःखाचा डोंगर

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहरातील बळीराम पेठ परिसरातील मलिक पार्क येथील रहिवासी मसूद शेख नवाज (वय ५९) यांचे दि. ९ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाचा मोठा धक्का कुटुंबीयांना बसला असतानाच, जावयाच्या अंत्यविधीसाठी पुण्याहून जळगावात आलेल्या त्यांच्या सासू शकीला सलीम खान यांचेही अचानक निधन झाले. जावयाचा अंत्यविधी सुरू असतानाच सासूची प्राणज्योत मालवल्याने या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

शेख मसूद यांच्या निधनानंतर दि. १० रोजी सकाळी ११ वाजता बळीराम पेठेतील अल -अमीन अपार्टमेंट येथून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यांच्या अंत्यविधीसाठी त्यांच्या सासू शकीला सलीम खान या पुणे येथून मंगळवारी सकाळीच जळगावात आल्या होत्या. जावयाच्या निधनाची बातमी आणि त्यानंतरचे दुःखद वातावरण यामुळे त्या व्यथित झाल्या होत्या.

अंत्यविधीची तयारी सुरू असतानाच प्रकृती ढासळली
अंत्यविधीची तयारी सुरू असतानाच त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. नातेवाईकांनी तातडीने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, अजिंठा चौफुली येथील मुस्लिम कब्रस्तानमध्ये शेख मसूद यांचा अंत्यविधीसाठी घेऊन जात असतानाच रुग्णालयात त्यांच्या सासू शकीला खान यांचीही प्राणज्योत मालवली.

काही तासात दोघांचे निधन
एकीकडे जावयाचा अंत्यविधी सुरू असताना दुसरीकडे सासूच्या निधनाची बातमी समोर आल्याने नातेवाईकांना मोठा धक्का बसला. अवघ्या काही तासांत एकाच कुटुंबावर दोन दुःखद प्रसंग ओढवल्याने उपस्थितांचे मन हेलावून गेले. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

शेख मसूद यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, ४ मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. ते कय्यूम नवाज यांचे लहान बंधू, तर पत्रकार जकी अहमद यांचे मामा होत. तसेच शकीला सलीम खान यांच्या पश्चात पती, ४ मुले, ४ मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button