तीन दिवसात दुसऱ्यांदा जळगावात पकडला गावठी कट्टा
रामानंद पोलीसांची कारवाई : गावठी कट्ट्यासह सराईत गुन्हेगार ताब्यात

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्ह्यातील रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने रविवारी पिंप्राळा परिसरात धडक कारवाई करून सराईत गुन्हेगार महेंद्र उर्फ दादू समाधान सपकाळे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून गावठी बनावटीचा कट्टा आणि एक जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहे. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा निर्धार दिसून आला.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंप्राळा हुडको कॉलनी परिसरात दहशत माजवणाऱ्या दादू सपकाळेने हातात गावठी कट्टा घेऊन लोकांना धमकावले होते. यामुळे परिसरातील दुकानदार आणि रहिवासी भयभीत झाले असून, त्यांनी दुकाने बंद करण्यास सुरुवात केली असल्याची माहिती रामानंद नगर पोलीस स्टेशनला मिळाली. तत्काळ गुन्हे शोध पथकाने परिसरात धाव घेतली. नागरिकांच्या मदतीने शोध घेत पळत असलेल्या संशयीत आरोपीचा शोध लागला. तो खंडेराव नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर दिसताच पोलिसांनी शिताफीने सापळा रचून त्याला पकडले.
रामानंद नगर पोलीस स्टेशनला दादू सपकाळेविरुद्ध एकूण पाच गंभीर गुन्हे दाखल आहेत. या कारवाईमुळे गुन्हेगारीला धाक बसण्यास मदत होईल, असे पोलिस सूत्रांनी सांगितले. गुन्ह्याचा पुढील तपास पोउपनि सचीन रणशेवरे करीत आहेत. पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांनी पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर बारकाईने नजर ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या, ज्यामुळे अशा कारवाया शक्य झाल्या आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर परिसरातील नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले असून, गुन्हे नियंत्रणासाठी अधिक सक्रिय भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे.
पथकात यांचा होता सहभाग
संपूर्ण कामगिरी पोलीस अधिक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील पोउपनि सचीन रणशेवरे, पोहेका जितेंद्र राजपुत, सुधाकर अंभोरे, जितेंद्र राठोड, सुशील चौधरी, पोना हेमंत कळसकर, मनोज सुरवाडे, रेवानंद साळुंखे, योगेश बारी, विनोद सुर्यवंशी आणि गोविंदा पाटील यांनी केली आहे.






