दिवसा ढवळ्या झालेल्या जबरी चोरीचा छडा; पाच आरोपी पुण्यातून ताब्यात, ७.१९ लाखांचा मुद्देमाल जप्त

दिवसा ढवळ्या झालेल्या जबरी चोरीचा छडा; पाच आरोपी पुण्यातून ताब्यात, ७.१९ लाखांचा मुद्देमाल जप्त
यवतमाळ : शहरातील मुख्य रस्त्यावर दिवसा ढवळ्या पोस्टमास्तरला अडवून ७ लाखांची रोकड लंपास केल्या प्रकरणाचा यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसांत छडा लावत पाच आरोपींना पुण्यातून अटक केली असून, त्यांच्याकडून ७.१९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
१३ मे २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास बाभुळगाव पोस्ट कार्यालयाचे पोस्टमास्तर सुभाष नारायण बारसे हे ७ लाख रुपये रोख रक्कम (५०० रुपयांच्या नोटांचे १४ बंडल) मुख्य पोस्ट ऑफिस, यवतमाळ येथून घेऊन दुचाकीवरून बाभुळगावकडे जात असताना करळगाव घाटात अज्ञात चोरट्यांनी त्यांना अडवले. चाकूचा धाक दाखवून त्यांची ऍक्टीव्हा दुचाकी व त्यातील रक्कम घेऊन आरोपी पसार झाले होते. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गंभीर गुन्ह्याच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष सूचना देण्यात आल्या होत्या. गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि मोबाईल टॉवर लोकेशनच्या आधारे यवतमाळातील पाच संशयित आरोपींचा तपास करण्यात आला. त्यामध्ये पियुष कावळे, राजेश ठोंबरे, प्रतिक घरात, रुतिक तुरणकर आणि सावन पंचधाई यांचा समावेश आहे. पियुष कावळे हा बाभुळगाव पोस्ट ऑफिसमध्ये ग्रामीण डाक सेवक म्हणून कार्यरत असून, अलीकडेच तो रजेवर होता, अशी माहितीही तपासात पुढे आली.
दरम्यान, चोरीस गेलेली ऍक्टीव्हा दुचाकी पोलीस स्टेशन कळंबच्या हद्दीत बेवारस अवस्थेत आढळून आली. त्यानंतर मोबाईल विश्लेषणातून चार आरोपी सध्या पुण्यात असल्याचे निष्पन्न झाले. गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे गाठून पियुष कावळे, राजेश ठोंबरे, प्रतिक घरात, रुतिक तुरणकर यांना अटक केली. त्यांच्या साथीदार सावन पंचधाईला यवतमाळ येथून ताब्यात घेण्यात आले.
पोलिसी तपासात सर्व आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांच्याकडून ६,५९,००० रुपये रोख रक्कम, गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या दोन मोटारसायकली (शाईन व स्प्लेंडर) असा एकूण ७.१९ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतिश चवरे, पोउपनि गजानन राजमल्लु व स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी साजीद हाशम, बंडु डांगे, रुपेश पोली, योगेश गवार, प्रशांत हेडाऊ, काविश पाळेकर, आकाश सहारे, आकाश सुर्यवंशी, दिगांबर पिलावर, देवेंद्र होले यांच्या संयुक्त पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.