भडगाव तालुक्यात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा अपघात; चालकाचा मृत्यू

भडगाव तालुक्यात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा अपघात; चालकाचा मृत्यू
भडगाव प्रतिनिधी
भडगाव तालुक्यातील वाक गावाजवळील गिरणा नदीच्या पात्रातून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचे टायर फुटल्याने अपघात झाला. यात ३५ वर्षीय चालक रामदास सुभाष सोनवणे (रा. पेठ, भडगाव) यांचा ट्रॅक्टरखाली दबून जागीच मृत्यू झाला. ही घटना १७ मे २०२५ रोजी मध्यरात्री घडली. याप्रकरणी भडगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे
.प्राप्त माहितीनुसार, भडगाव तालुक्यातील गिरणा नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक सुरू आहे. रात्रीच्या वेळी वाक गावाजवळील वडाच्या झाडानजीक रामदास सोनवणे ट्रॅक्टर चालवत असताना त्याचे टायर फुटले. त्याने खाली उडी मारण्याचा प्रयत्न केला, परंतु ट्रॅक्टर पलटी होऊन त्याच्यावर पडले. त्याला तातडीने भडगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय मुंडे यांनी त्याला मृत घोषित केले.या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार संजय पाटील करत आहेत. अवैध वाळू वाहतुकीमुळे अशा दुर्घटना घडत असल्याने प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.