अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; चार वाहने जप्त

अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; चार वाहने जप्त
भडगाव(प्रतिनिधी )तालुक्यातील कोठली व टोणगाव परिसरात गिरणा नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतुकीविरोधात महसूल व पोलिस प्रशासनाने धडक कारवाई करत तीन ट्रॅक्टर व एक डंपर जप्त केला. मंगळवारी रात्री करण्यात आलेल्या या कारवाईमुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
महसूल विभागाच्या पथकाने कोठली येथून गिरणा नदीपात्रातून अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर तसेच टोणगाव परिसरातून वाळू वाहतूक करणारा आणखी एक ट्रॅक्टर पकडला. तर भडगाव ग्रामीण रुग्णालयासमोर भडगावहून पाचोऱ्याकडे जात असलेला अवैध वाळूने भरलेला डंपर पोलीस उपनिरीक्षक सुशीलसोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल निलेश ब्राम्हणकर व चालक राजू पाटील यांनी ताब्यात घेतला.कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेली चारही वाहने भडगाव तहसील कार्यालयात जमा करण्यात आली असून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. अवैध वाळू वाहतुकीविरोधातील अशा कारवाया यापुढेही सुरू राहतील, अशी माहिती तहसीलदार शितल सोलाट यांनी दिली.
गिरणा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे सातत्याने येत होत्या. त्यानुसार महसूल व पोलिस विभागाने संयुक्तपणे ही मोहीम राबविली. अवैध वाळू उपशामुळे नदीपात्राचे नुकसान होण्याबरोबरच पर्यावरणीय समतोल बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अशाप्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने नियमित गस्त व विशेष तपासणी मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या कारवाईमुळे परिसरातील वाळू माफियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाच्या पुढील कारवायांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कारवाईत अधिकारी सहभागी
कारवाईत मंडळ अधिकारी दिनेश येंडे यांच्या नेतृत्वाखाली अंजनविहीरेचे ग्राम महसूल अधिकारी एस. के. मांडोळे, कोळगावचे व्ही. पी. शिंदे, आंचळगावचे लोकेश महाजन, तांदुळवाडीचे करण कुलकर्णी, वाकचे गौरव पगारे, टोणगावचे किरण मोरे, कोठलीचे समाधान हुल्लुळे, कजगावचे गितेश महाजन, टोणगावचे प्रशांत कुंभारे तसेच महसूल सहाय्यक महादू कोळी यांनी सहभाग घेतला.






