Social

नवरात्रोत्सव व धार्मिक मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश

नवरात्रोत्सव व धार्मिक मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश
जळगाव, : नवरात्रोत्सव तसेच जिल्ह्यातील विविध ठिकाणी होणारे बालाजी वहनोत्सव, रथोत्सव व पालखी मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील संबंधित ठिकाणचे आठवडी बाजार नियमित दिवशी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी रोहन घुगे यांनी दिले आहेत.

दिनांक ११ ते २३ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत नवरात्रोत्सव, तर ११ ते २६ ऑक्टोबरदरम्यान चोपडा, धरणगाव, पारोळा, भडगाव व मेहुणबारे येथे विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. या काळात दुर्गादेवी विसर्जन मिरवणुका, रथोत्सव व पालखी सोहळ्यांमध्ये नागरिकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई मार्केट अँड फेअर्स ॲक्ट, १८६२ च्या कलम ५ (अ) व ५ (क) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून ११ ते २६ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत चोपडा, धरणगाव, पारोळा, भडगाव, मेहुणबारे व जिल्ह्यातील इतर संबंधित ठिकाणचे आठवडी बाजार नियमित दिवशी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

संबंधित नगर परिषदा, नगर पंचायती व स्थानिक प्रशासनाने नागरिक आणि व्यापाऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी हे आठवडी बाजार नियमित दिवसाऐवजी दुसऱ्या किंवा सोईस्कर पुढील दिवशी भरविण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button