भेसळयुक्त कापूस बियाण्याचा शेतकऱ्याना फटका ; कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार

भेसळयुक्त कापूस बियाण्याचा शेतकऱ्याना फटका ; कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार
अमळनेर पंकज शेटे अंतुर्ली / रंजाणे येथील शेतकरी राजेश सुभाष पाटील, सुभाष पोपट पाटील व उज्वला ज्ञानेश्वर पाटील यांनी सदोष कापूस बियाण्याबाबत तालुका कृषी अधिकारी, अमळनेर यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
सदर शेतकऱ्यांनी त्यांच्या अंतुर्ली शिवारातील गट क्रमांक २६१९, क्षेत्र ३.४९ हेक्टरमध्ये दिनांक १७ जून २०२५ रोजी कापसाची लागवड केली होती. हे बियाणे अमळनेर येथील तिरुपती ट्रेडर्सकडून खरेदी करण्यात आले होते. बियाणे कंपनीचे नाव US Agri Seeds असून हे संकरीत बियाणे असल्याची माहिती देण्यात आली होती.
लागवडीनंतर योग्य प्रमाणात शेती मशागत, खतांचा वापर, तणनाशके व फवारणी करूनही पिकाची वाढ समाधानकारक झाली नाही. कपाशीची झाडे लालसर झाली असून फवारणीचा कुठलाही परिणाम झाला नाही, अशी तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. या सदोष बियाण्यामुळे अपेक्षित उत्पन्नाच्या सुमारे ७० टक्के नुकसान झाल्याचे अर्जात नमूद करण्यात आले आहे.
सदर बियाण्याची पावती, आधारकार्ड, सातबारा उतारा तसेच बियाण्याचा लॉट क्रमांक यासह सर्व कागदपत्रे तक्रारीसोबत सादर करण्यात आली आहेत. शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी यांनी शेतात प्रत्यक्ष पंचनामा करून योग्य ती तजवीज करावी व नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली असून भेसळयुक्त बियाण्यांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. तालुका कृषी विभागाकडून पंचनामा करून पुढील कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.






