मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून युवकांना उद्योग उभारणीची संधी

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून युवकांना उद्योग उभारणीची संधी
उत्पादन उद्योगासाठी १०० लाख, तर सेवा उद्योगासाठी ५० लाखांपर्यंत प्रकल्पासाठी अर्ज करता येणार
जळगाव – महाराष्ट्र शासनामार्फत राज्यातील शहरी व ग्रामीण युवक-युवतींना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम सन २०१९ पासून राबविण्यात येत आहे. जिल्हा उद्योग केंद्र व खादी ग्रामोद्योग मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या या योजनेतून उद्योजकांना उद्योग उभारणीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक असून, तो महाराष्ट्राचा कायमस्वरूपी रहिवासी असावा. तसेच अर्जदाराने यापूर्वी शासनाच्या कोणत्याही अनुदानाधारित स्वयंरोजगार योजनेचा लाभ घेतलेला नसावा. योजनेअंतर्गत उत्पादन उद्योगासाठी १०० लाख रुपयांपर्यंत, तर सेवा उद्योगासाठी ५० लाख रुपयांपर्यंतच्या प्रकल्पासाठी अर्ज करता येईल. १० लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पादन प्रकल्पासाठी व ५ लाख रुपयांपेक्षा अधिक सेवा प्रकल्पासाठी अर्जदार किमान आठवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
उत्पादन व सेवा उद्योग, कृषीपूरक व्यवसाय, कृषी आधारित उद्योग, ई-वाहतूक व त्यावर आधारित व्यवसाय, एकाच नाममुद्रेवर आधारित संघटित साखळी विक्री केंद्रे, फिरते विक्री केंद्र, खाद्यान्न केंद्र, कुक्कुटपालन, अंडी उबवणी केंद्र, मधमाशीपालन, रेशीम उद्योग, हॉटेल, ढाबा, होम स्टे, क्लाउड किचन, जलक्रीडा, मासेमारी व प्रवासी वाहतुकीसाठी बोट व्यवसाय या योजनेअंतर्गत पात्र आहेत.
अनुसूचित जाती-जमाती, महिला, इतर मागासवर्ग, दिव्यांग, माजी सैनिक, विमुक्त व भटक्या जमाती तसेच अल्पसंख्याक प्रवर्गातील अर्जदारांना शहरी भागासाठी बँकेने मंजूर केलेल्या प्रकल्प किमतीच्या २५ टक्के व ग्रामीण भागासाठी ३५ टक्के अनुदान मिळेल. यासाठी त्यांना ५ टक्के स्वगुंतवणूक करावी लागेल. इतर सर्व प्रवर्गातील अर्जदारांना शहरी भागासाठी १५ टक्के व ग्रामीण भागासाठी २५ टक्के अनुदान मिळेल. या लाभार्थ्यांना १० टक्के स्वगुंतवणूक करावी लागेल.
योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने http://maha-cmegp.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज सादर करावा. अर्ज करताना स्वतःचा फोटो, आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला अथवा जन्म दाखला, अधिवास प्रमाणपत्र, गुणपत्रिका, पॅन कार्ड, उद्योगाचा प्रकल्प अहवाल, जातीचा दाखला, हमीपत्र व दिव्यांग प्रमाणपत्र आदी कागदपत्रे अपलोड करावी लागतील. इच्छुकांचे अर्ज या कार्यालयामार्फत विनामूल्य भरून दिले जातील.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक-युवतींनी या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी जिल्हा उद्योग केंद्र/खादी ग्रामोद्योग मंडळ, तळमजला, सद्गुरू एज्युकेशन सोसायटी इमारत, कन्याशाळेसमोर, ख्वाजामिया चौक, जळगाव येथे कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी प्रत्यक्ष भेट द्यावी. सदर योजना व कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या इतर योजना पूर्णतः निःशुल्क असून, त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. तसेच कार्यालयाकडून कोणत्याही खासगी व्यक्तीची नियुक्ती करण्यात आलेली नाही.
खासगी व्यक्तीकडून फसवणूक झाल्यास कार्यालय जबाबदार राहणार नाही, याची नोंद घ्यावी, असे आवाहन उपआयुक्त (उद्योग व सेवा), जिल्हा उद्योग केंद्र, जळगाव यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी इमेल didic.jalgaon@maharashtra.gov.in दूरध्वनी क्रमांक ०२५७-२२५२८३२ येथे संपर्क साधावा.







