राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या समान व असमान निधी योजनांसाठीशासनमान्य ग्रंथालयांनी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या समान व असमान निधी योजनांसाठीशासनमान्य ग्रंथालयांनी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
जळगाव, भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या समान निधी व असमान निधी योजनांद्वारे राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध अर्थसहाय्य योजना ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या मार्फत राबविण्यात येत आहेत.
सन २०२६-२७ साठी विविध समान व असमान निधी योजनांचा लाभ घेण्यासाठी राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांकडून विहित नमुन्यात प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. यासंदर्भातील नियम, अटी व अर्जाचा नमुना राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या www.rrrlf.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून इच्छुक ग्रंथालयांनी अर्जाचा नमुना डाउनलोड करून घ्यावा.
सन २०२६-२७ साठीच्या समान निधी योजनेंतर्गत इमारत बांधकाम व विस्तार अर्थसहाय्य योजना कमाल रु. २५.०० लाख उपलब्ध असून, या योजनेव्यतिरिक्त इतर समान निधी योजनांचा लाभ केंद्रीय पद्धतीने देण्यात येत असल्याने त्या योजनांसाठी प्रस्ताव सादर करू नयेत.
असमान निधी योजनेंतर्गत ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधनसामग्री, फर्निचर, इमारत बांधकाम व विस्तारासाठी अर्थसहाय्य. फर्निचर खरेदीसाठी रु. ४.०० लाख व इमारत बांधकामासाठी (प्रस्ताव फक्त एकदाच) रु. १०.०० ते रु. १५.०० लाख, “ज्ञान कोपरा” विकसित करण्यासाठी रु. २.५० लाख व विशेष आधुनिकीकरणासाठी रु. २.०० लाख अर्थसहाय्य तसेच
५०/६०/७५/१००/१२५/१५० वर्षे महोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी रु. ६.२० लाख तसेच इमारत विस्तारासाठी रु. १०.०० लाख अर्थसहाय्य, राष्ट्रस्तरीय चर्चासत्र, कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग व जनजागृती कार्यक्रम आयोजनासाठी रु. १.५० लाख/ रु. २.५० लाख / रु. ३.०० लाख अर्थसहाय्य व “बालकोपरा” स्थापन करण्यासाठी कमाल रु. ६.८० लाख अर्थसहाय्य उपलब्ध आहे.
इच्छुक ग्रंथालयांनी प्रतिष्ठानचे www.rrrlf.gov.in संकेतस्थळ पाहावे. आवश्यकता असल्यास संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. वरीलपैकी कोणत्याही एका योजनेसाठीचा प्रस्ताव आवश्यक कागदपत्रांसह इंग्रजी किंवा हिंदी भाषेत चार प्रतींमध्ये संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडे दि. २१ ऑगस्ट २०२६ पर्यंत सादर करावा. तसेच राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या ऑनलाइन प्रणालीद्वारेही प्रस्ताव ऑनलाइन सादर करावेत, असे आवाहन प्र. ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी केले आहे.






