मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांचा पाच गावांना अचानक भेटी देऊन विकासकामांचा आढावा
१५ व्या वित्त आयोगाच्या कामांच्या अभिलेखांची तपासणी; शाळा, अंगणवाडी व आरोग्य उपकेंद्रांची पाहणी

मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांचा पाच गावांना अचानक भेटी देऊन विकासकामांचा आढावा
१५ व्या वित्त आयोगाच्या कामांच्या अभिलेखांची तपासणी; शाळा, अंगणवाडी व आरोग्य उपकेंद्रांची पाहणी
प्रत्येक ग्रामपंचायतीने किमान २०० जलतारा शोषखड्डे तयार करण्याच्या सूचना
जळगाव, : जिल्हा परिषद जळगावच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी बुधवार दि. 28 ऑक्टोबर रोजी चोपडा तालुक्यातील घुमावल बुद्रुक, गोरगावले बुद्रुक, लासूर, गणपूर आणि आकुलखेडा या गावांना अचानक भेटी देऊन ग्रामपंचायत स्तरावरील कामकाजाचा तसेच विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेतला. या दौऱ्यात त्यांनी ग्रामपंचायतींच्या अभिलेखांची तपासणी करण्यासोबतच पंधराव्या वित्त आयोगांतर्गत करण्यात आलेल्या विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली.
ग्रामपंचायत कामकाज व विकासकामांची तपासणी
मुख्य कार्यकारी अधिकारी नायर यांनी ग्रामपंचायतींमधील अभिलेखांची तपासणी करून पंधराव्या वित्त आयोगांतर्गत झालेल्या कामांची कागदोपत्री नोंद आणि प्रत्यक्ष कामांची स्थिती यांची पडताळणी केली. तसेच जनसुविधा व मूलभूत सुविधा योजनांतर्गत करण्यात आलेल्या विकासकामांची पाहणी केली. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेऊन कामकाजाची सद्यस्थिती जाणून घेतली.
शाळा, अंगणवाडी व आरोग्य उपकेंद्रांना भेटी
या दौऱ्यादरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हा परिषद शाळांना भेटी देऊन शाळांमधील स्वच्छतागृहांची स्थिती आणि उपलब्ध सुविधांची पाहणी केली. विद्यार्थ्यांना स्वच्छ व सुरक्षित शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने त्यांनी संबंधित बाबींचा आढावा घेतला.
तसेच विविध अंगणवाडी केंद्रांना भेटी देऊन तेथील कामकाजाची माहिती घेतली. गोरगावले बुद्रुक आणि लासूर येथील आरोग्य उपकेंद्रांची तपासणी करून आरोग्य सेवांचा आढावा घेतला. यावेळी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.
घरकुल योजनांच्या प्रगतीचा आढावा
ग्रामीण भागातील पात्र लाभार्थ्यांना हक्काचे घर उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा एक व टप्पा दोन तसेच रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना आणि मोदी आवास योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. घरकुल मंजुरी, बांधकामाची प्रगती आणि योजनांची प्रभावी अंमलबजावणी याबाबत त्यांनी माहिती घेतली.
जलजीवन मिशन व व्ही. जी. रामजी योजनांवर भर
जलजीवन मिशनअंतर्गत करण्यात आलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. तसेच दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर व्ही. जी. रामजी योजनेंतर्गत आवश्यक कामे शेल्फवर घेऊन ती सुरू करण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी नायर यांनी संबंधित यंत्रणेला सूचना दिल्या.
प्रत्येक ग्रामपंचायतीत किमान २०० जलतारा शोषखड्डे तयार करण्याचे उद्दिष्ट
पावसाचे पाणी जमिनीत मुरवून भूजलपातळी वाढविणे आणि जलसंधारणाला चालना देणे या उद्देशाने मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रत्येक ग्रामपंचायतीने किमान २०० जलतारा शोषखड्डे तयार करण्याच्या सूचना दिल्या. जलसंधारणाच्या कामांमध्ये लोकसहभाग वाढवून गावपातळीवर पाण्याच्या उपलब्धतेसाठी ठोस उपाययोजना करण्यावर त्यांनी भर दिला.
या अचानक पाहणी दौऱ्याच्या माध्यमातून ग्रामपंचायत स्तरावरील कामकाजात पारदर्शकता, विकासकामांचा दर्जा, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी भर दिला.







