रविद्र कोळी यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या चोपडा तालुकाध्यक्षपदी नियुक्ती


रविद्र कोळी यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या चोपडा तालुकाध्यक्षपदी नियुक्ती
नूतन कार्यकारिणीची घोषणा; पत्रकारांच्या हक्क, सन्मान व सुरक्षिततेसाठी कार्य करण्याचा संकल्प
चोपडा I रविंद्र कोळी
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईच्या खान्देश विभागाच्या संघटन विस्ताराला वेग देण्यात येत असून, चोपडा तालुका कार्यकारिणीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये श्री. रविद्र कोळी यांची चोपडा तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
ही नियुक्ती प्रदेशाध्यक्ष निलेश सोमाणी, प्रदेश संघटक संजय भोकरे, प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे व प्रदेश उपाध्यक्ष किशोर रायसाकडा यांच्या आदेशाने खान्देश विभागीय अध्यक्ष डॉ. समाधान मैराळे यांनी केली.
चोपडा तालुका कार्यकारिणीत अध्यक्ष रविद्र कोळी, सचिव अशोक छन्नू कोळी, उपाध्यक्ष चंद्रकांत चंपालाल पाटील, संघटक अविनाश जगनाथ बाविस्कर, कोषाध्यक्ष पवन संजय कोळी, प्रसिद्धी प्रमुख मिलिंद दत्तात्रय वाणी तसेच कार्यकारिणी सदस्य महेंद्र सुकदेव पाटील व रमेश दोंडू पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नूतन कार्यकारिणीच्या माध्यमातून चोपडा तालुक्यातील पत्रकारांना संघटित करणे, पत्रकारांच्या विविध समस्या व अडचणींचा पाठपुरावा करणे, पत्रकारांच्या हक्क व सन्मानासाठी आवाज उठविणे तसेच पत्रकारांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे, यावर विशेष भर देण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून राबविण्यात येणारे पत्रकार मदत केंद्र व हेल्पलाईन, अपघात संरक्षण विमा योजना, पत्रकार प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिरे तसेच पत्रकारांच्या अडचणीच्या काळात मदतीचे उपक्रम चोपडा तालुक्यात प्रभावीपणे पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
खान्देश विभागात संघटनेची मजबूत बांधणी करण्याच्या उद्देशाने जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांमध्ये तालुकानिहाय संघटन विस्ताराचे काम सुरू असून, त्याचाच एक भाग म्हणून चोपडा तालुक्यात नूतन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे.
“पद हे केवळ सन्मानाचे नसून जबाबदारीचे आहे. पत्रकारांच्या सुख-दुःखात संघटना खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभी राहिली पाहिजे,” या भूमिकेतून नूतन कार्यकारिणीने काम करावे, असे आवाहन खान्देश विभागीय अध्यक्ष डॉ. समाधान मैराळे यांनी केले.
नूतन तालुकाध्यक्ष रविद्र कोळी यांच्या नेतृत्वाखाली चोपडा तालुक्यात पत्रकार संघाची संघटनात्मक ताकद वाढेल आणि पत्रकारांच्या प्रश्नांना प्रभावी व्यासपीठ मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
नूतन कार्यकारिणीचे पत्रकार बांधव, सामाजिक कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील मान्यवर व हितचिंतकांकडून अभिनंदन होत असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.






