जळगावात विहिरीचा स्लॅब कोसळला: ९१ वर्षीय वृद्धासह तिघे विहिरीत पडले; अग्निशमन दलाकडून सुखरूप सुटका

जळगावात विहिरीचा स्लॅब कोसळला: ९१ वर्षीय वृद्धासह तिघे विहिरीत पडले; अग्निशमन दलाकडून सुखरूप सुटका
गणेशवाडीतील घटना; अग्निशमन दलाच्या तात्काळ प्रतिसादामुळे मोठी दुर्घटना टळली
जळगाव: शहरातील गणेशवाडी भागात बुधवारी दुपारी एका घराच्या पाठीमागे विहिरीतून इलेक्ट्रिक मोटार काढत असताना विहिरीवरील जुना स्लॅब अचानक तडकून खाली कोसळला. या अपघातात रामलाल हिरामण भावसार (९१), सिद्धेश महेंद्र भावसार (२४) आणि दर्शन राजेंद्र खाचणे (२३) हे तिघे विहिरीत पडले.
दुपारी पाऊणेपाच वाजेच्या सुमारास एन. के. पिंजारी यांनी अग्निशमन दलाला कॉल केला. मुख्य अग्निशमन अधिकारी अश्वजीत घरडे स्वतः जवानांसह घटनास्थळी आले आणि त्यांनी थेट विहिरीत उतरून रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. अग्निशमन दलाचे वाहन चालक भारत बारीसर, देविदास सुरवाडे, निवांत इंगळे आणि फायरमन रोहिदास चौधरी, तेजस जोशी, सुमित साळवे, यश मनोरे, चेतन सपकाळे, विठ्ठल पाटील, ऋषिकेश वाघ यांनी दोरखंडाच्या मदतीने तिघांनाही तातडीने बाहेर काढले. वेळेत मिळालेल्या मदतीमुळे ९१ वर्षांच्या आजोबांसह तिघांचेही प्राण वाचले असून परिसरात जवानांचे कौतुक होत आहे.






