रायसोनी नगरात मध्यरात्री एकाच वेळी चार ठिकाणी चोरी : मंदिरातील पादुका, मूर्ती व रोकड लंपास; चड्डी गँग सीसीटीव्हीत कैद

रायसोनी नगरात मध्यरात्री एकाच वेळी चार ठिकाणी चोरी : मंदिरातील पादुका, मूर्ती व रोकड लंपास; चड्डी गँग सीसीटीव्हीत कैद
जळगाव, : शहरातील रायसोनी नगर परिसरात रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी धुमाकूळ घालत तब्बल चार ठिकाणी चोरी केली. श्री गजानन महाराज मंदिर व काशी विश्वनाथ मंदिरातून चांदीच्या पादुका, धातूची मूर्ती, दानपेटीतील रोकड व अन्य साहित्य तर एका घरातून वस्तूंची उलथापालथ , तिसऱ्या मंदिरातून पेन ड्राईव्ह असा ऐवज लंपास केला. या घटना ३ ऑगस्टच्या रात्री सुमारे २.३० वाजेच्या सुमारास घडल्या असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
श्री गजानन महाराज मंदिराचे दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे ७०० ग्रॅम वजनाच्या चांदीच्या पादुका, दीड फूट उंचीची गणपतीची धातूची मूर्ती व दानपेटीतील रक्कम चोरून नेली. ही दानपेटी अनेक दिवसांपासून उघडलेली नसल्याने चोरी गेलेल्या रकमेचा अंदाज लावणे कठीण आहे.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक रामानंद नगर पोलीस ठाण्यात पोहोचले असता, इतर दोन मंदिरांतही चोरी झाल्याचे उघडकीस आले. याशिवाय केतन सुरेश चौधरी यांच्या बंद घराचे कुलूप तुटलेले आढळून आले. त्यांच्या शेजाऱ्यांच्या माहितीनुसार, चोरट्यांनी घरातील साहित्य अस्ताव्यस्त टाकले असून, चोरीस गेलेल्या वस्तूंचा तपशील चौधरी कुटुंबाच्या परतीनंतरच समजू शकेल.
या सर्व चोरीच्या घटनांचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून, चड्डी घातलेल्या चार संशयित व्यक्ती त्यामध्ये कैद झाल्या आहेत. मास्क व रुमालाने चेहरा झाकलेले हे चोरटे मंदिर परिसरात संचार करताना दिसत असून, त्यापैकी एकाच्या हातात चप्पल असून दुसऱ्याने ती कमरेला अडकवलेली दिसते. हे दृश्य पहाटे २:३१ वाजताचे आहे.
गजानन मंदिरापासून सुमारे ४०० मीटरवर असलेल्या काशी विश्वनाथ मंदिरातही दानपेटी व तिजोरीचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोकड लंपास केली. तर शिवनेरी नर्मदेश्वर महादेव मंदिरात चोरीचा प्रयत्न करण्यात आला. मात्र या ठिकाणी दानपेटीच नसल्याने, चोरटे फक्त एक पेन ड्राईव्ह घेऊन निघून गेले. विशेष म्हणजे, या मंदिरात यापूर्वीही सहा महिन्यांपूर्वी चोरी झाली होती.
दरम्यान, श्री गजानन महाराज मंदिराजवळ राहणाऱ्या एका व्यक्तीने पहाटे चार संशयितांना मंदिराभोवती वावरताना पाहिले व आरडाओरड केल्यानंतर चोरटे घटनास्थळावरून पलायन झाले.
या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून, पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवावीत अशी मागणी नागरिकांनी केली आहे.