Crime

ACB Trap : अनुकूल अहवालासाठी दीड लाखांची लाच घेताना उपनिबंधकासह, कार्यकारी अधिकारी जाळ्यात!

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । अवैध सावकारी चौकशी प्रकरणात तक्रारदाराच्या बाजूने अनुकूल अहवाल पाठवण्यासाठी आणि गुन्हा दाखल न करण्यासाठी ५ लाख रुपयांची लाच मागून तडजोडीअंती ३ लाख रुपये ठरवून, त्यातील पहिला हफ्ता १ लाख ५० हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना उपनिबंधक कार्यालयातील अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून खाजगी इसमाला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे. या कारवाईमुळे जळगाव जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात आणि शासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी वर्ग-१ चे अधिकारी उपनिबंधक जगदीश बाबूराव बारी आणि जळगाव जिल्हा बँक असोसिएशनचा मानद कार्यकारी अधिकारी देविदास धनसिंग पाटील (खाजगी इसम) यांच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमके प्रकरण काय?
तक्रारदार यांच्यावर अवैध सावकारी कायद्यांतर्गत कारवाई झाली होती. या प्रकरणाची सुनावणी उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव तालुका कार्यालय येथे सुरू होती. या चौकशी प्रकरणी पुढील सुनावणीची तारीख विचारण्यासाठी तक्रारदार जेव्हा उपनिबंधक कार्यालयात गेले, तेव्हा उपनिबंधक जगदीश बारी यांनी तक्रारदार व त्यांच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल न करण्यासाठी आणि अनुकूल अहवाल पाठवण्यासाठी ५ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली.

३ लाखांची केली मागणी
पडताळणी दरम्यान आरोपी जगदीश बारी याने तक्रारदाराला टोमणा मारत म्हटले की, “तुम्ही मागच्या प्रकरणाच्या वेळी वकील लावला, म्हणून आमचे खूप मोठे नुकसान झाले; म्हणूनच आम्ही नकारात्मक अहवाल दिला होता. पण आता अनुकूल अहवाल पाठवतो.” अखेर तडजोडीअंती ३ लाख रुपये देण्याचे ठरले. या लाचेच्या रकमेपैकी पहिला हफ्ता १ लाख ५० हजार रुपये बुधवार, दिनांक २० मे रोजी खाजगी इसम देविदास पाटील याच्याकडे देण्यास सांगितले गेले.

बी.जे. मार्केटमध्ये लाच स्वीकारताना रंगेहात पकडले
तक्रारदाराने या संदर्भात १८ मे रोजी जळगाव एसीबीकडे रीतसर तक्रार नोंदवली होती. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर, आज २० मे रोजी दुपारी उपनिबंधक (परसेवा), सहकारी संस्था, जळगाव जिल्हा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स असोसिएशन लि., तिसरा मजला, बी.जे. मार्केट, जळगाव येथे एसीबीने सापळा रचला. जगदीश बारी यांच्या सांगण्यावरून आरोपी क्र.२ देविदास पाटील याने तक्रारदाराकडून १ लाख ५० हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारली. रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने देविदास पाटील याला रंगेहात पकडले.

कारवाईतील संशयीत आरोपींची माहिती
पथकाने जगदीश बाबूराव बारी (वय ५६ वर्षे), पद: उपनिबंधक, उपनिबंधक सह संस्था, जळगाव (रा. शांतीनगर, यावल रोड, भुसावळ) (वर्ग-०१ अधिकारी) आणि देविदास धनसिंग पाटील (वय ४४ वर्षे), मानद कार्यकारी अधिकारी, जळगाव जिल्हा बँक असोसिएशन (रा. भुरे मामलेदार प्लॉट, शिवाजीनगर, जळगाव) (खाजगी इसम) यांना ताब्यात घेतले असून पुढील कार्यवाही सुरू आहे.

एसीबीचे पथक आणि मार्गदर्शन
संपूर्ण डक कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी आणि सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पर्यवेक्षण अधिकारी योगेश ठाकूर (पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि. जळगाव), सापळा अधिकारी रेश्मा अवतारे (पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. नंदुरबार, कॅम्प जळगाव) यांचे सापळा पथक पो.नि. हेमंत नागरे, पोहेका बाळू मराठे, मपोहेका संगीता पवार, पो.कॉ. मनोज पाटील आणि पो.कॉ. सचिन चाटे यांचा समावेश होता. तपासी अधिकारी श्रीमती स्मिता नवघरे (पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. जळगाव) या आहेत.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे आवाहन
शासकीय कामासाठी कोणीही लाचेची मागणी केल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगाव येथे थेट संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. टोल फ्री क्रमांक: १०६४ दूरध्वनी क्रमांक: ०२५७-२२३५४७७, व्हॉट्सॲप क्रमांक: ७५८८६ ६१०६४

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button