Crime

५० हजारांची लाच घेताना मंडळ अधिकारी, खासगी इसम जाळ्यात

नाशिक एसीबीची मोठी कारवाई, जळगावात दोन दिवसात दोन कारवाई

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद भागातील एका तक्रारदाराविरुद्ध करण्यात आलेली चौकशी बंद करण्यासाठी १ लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती ५० हजार रुपये स्वीकारणाऱ्या मंडळ अधिकाऱ्याला आणि एका खासगी इसमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

पथकाने अटक केलेल्या संशयीत आरोपींमध्ये मिलिंद प्रकाश देवरे (वय ३७) – मंडळ अधिकारी, वर्ग ३, नशिराबाद भाग, जळगाव, सुरेंद्र प्रल्हाद अहिरे (वय ३९) – खासगी इसम (व्यापारी), रा. पिंप्राळा, जळगाव यांचा समावेश आहे.

नेमकी घटना काय?
तक्रारदार हे त्यांच्या शेतात अवैध खोदकाम करत असल्याची तक्रार काही स्थानिक रहिवाशांनी तहसील कार्यालयात केली होती. मात्र, नंतर ती तक्रार मागे घेण्यात आली होती. या तक्रार अर्जाची चौकशी बंद करण्यासाठी मंडळ अधिकारी मिलिंद देवरे यांनी तक्रारदाराकडे १ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीनंतर ही रक्कम ५० हजार रुपये ठरवण्यात आली.

पिंप्राळा तलाठी कार्यालयासमोर सापळा
ठरल्याप्रमाणे लाचेची रक्कम मिलिंद देवरे यांनी खासगी इसम सुरेंद्र अहिरे याच्याकडे देण्यास सांगितले. आज, १२ मे २०२६ रोजी पिंप्राळा येथील तलाठी कार्यालयासमोर सापळा रचण्यात आला होता. सुरेंद्र अहिरे याने तक्रारदाराकडून ५० हजार रुपये स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहाथ ताब्यात घेतले.

गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
या प्रकरणी जळगाव येथील रामानंदनगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ आणि ७ अ नुसार गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई एसीबी नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी आणि सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुलकुमार नाईक व त्यांच्या पथकाने यशस्वी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत नागरे करत आहेत.

एसीबीचे आवाहन
कोणत्याही शासकीय लोकसेवकाने कामासाठी लाचेची मागणी केल्यास त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टोल फ्री क्रमांक १०६४ किंवा व्हॉट्सॲप क्रमांक ९९३०९९७७०० वर संपर्क साधावा, असे आवाहन विभागातर्फे करण्यात आले आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button