Crime

NEET नंतर पुन्हा TET चा पेपर फुटला, परीक्षा पुढे ढकलली!

परीक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह; राज्य परीक्षा परिषदेचा पारदर्शकतेवर भर

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवार, २८ जून रोजी राज्यभर आयोजित करण्यात आलेली शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पुढे ढकलण्यात आली आहे. भिवंडी येथे पोलिसांनी केलेल्या कारवाईदरम्यान काही व्यक्तींकडे परीक्षेतील प्रश्नांशी साधर्म्य असलेली माहिती आढळून आल्याने हा निर्णय घेण्यात आला.

राज्यातील एकूण १,०२८ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार होती. काही दिवसांपूर्वी झालेल्या NEET परीक्षेतील गैरप्रकारांच्या पार्श्वभूमीवर राज्य परीक्षा परिषदेकडून सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली होती. मात्र, गोपनीय माहितीच्या आधारे भिवंडी पोलिसांनी पहाटे छापा टाकल्यानंतर तपासात काही संशयितांकडे असलेल्या प्रश्नांचा परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेशी मेळ आढळल्याचे प्राथमिक पडताळणीत स्पष्ट झाले.

यानंतर संबंधित प्रकरणी भिवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पेपरफुटीचा नेमका प्रकार, त्यामागील साखळी आणि संबंधित आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर परीक्षा पूर्णपणे निष्पक्ष आणि पारदर्शक वातावरणात होणे आवश्यक असल्याचे सांगत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने २८ जूनची TET परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला आहे. नव्या परीक्षेच्या तारखेसह पुढील सर्व सूचना परिषदेकडून अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

या घटनेमुळे राज्यातील लाखो TET परीक्षार्थींमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, सलग दुसऱ्या मोठ्या परीक्षा गैरप्रकारामुळे परीक्षा व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button