भुसावळात कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये सराईत गुन्हेगार जेरबंद; शस्त्रे, चोरीचा मुद्देमाल जप्त

भुसावळात कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये सराईत गुन्हेगार जेरबंद; शस्त्रे, चोरीचा मुद्देमाल जप्त
जळगाव पोलीस आणि RPF ची संयुक्त कारवाई; ६० गुन्हेगारांच्या घरांची झाडाझडती, २७ संशयित ताब्यात
भुसावळ | प्रतिनिधी : भुसावळ शहर, रेल्वे परिसर आणि दीपनगर पॉवर प्लांट परिसरातील भंगार व कोळसा चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी जळगाव पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बल (RPF) यांनी मंगळवारी पहाटे संयुक्त ‘कॉम्बिंग ऑपरेशन’ राबवत मोठी कारवाई केली. चार तास चाललेल्या या विशेष मोहिमेत सराईत गुन्हेगारांना अटक, अवैध शस्त्र जप्ती आणि चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या नेतृत्वात पहाटे ४ ते सकाळी ८ वाजेपर्यंत ही मोहीम राबविण्यात आली.
सराईत आरोपी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात
कारवाईदरम्यान रेल्वे पोलीस ठाण्याचे तीन गैरजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले. त्यामध्ये सराईत आरोपी श्याम सुभाष शिरसाट (उर्फ श्याम काल्या) याला अटक करून रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
कोयत्यासह आरोपी जाळ्यात
पंचशील नगर परिसरातून भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यातील पाहिजे असलेला आरोपी शोहेब शाह शरीफ शाह याच्याकडून अवैध कोयता जप्त करण्यात आला. त्याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यानुसार स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला.
केबल चोरीचा गुन्हा उघड
दीपनगर पॉवर प्लांट परिसरात कारवाईदरम्यान राजू सुरवाडे (रा. निंभोरा) याच्याकडून सुमारे ५० किलो चोरीची केबल आणि केबल कापण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे भुसावळ तालुका पोलीस ठाण्यातील केबल चोरीचा एक गुन्हा उघडकीस आला.
६० घरांची झाडाझडती, २७ संशयित ताब्यात
मोहीमेदरम्यान भंगार व कोळसा चोरीतील ६० रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या घरांची झाडाझडती घेण्यात आली. तसेच २७ संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून पाच भंगार दुकानांची तपासणी करण्यात आली.
डिजिटल नोंदी अद्ययावत
कारवाईदरम्यान संशयितांची डिजिटल नोंद अद्ययावत करून जळगाव पोलीस व RPF यांच्यात माहितीची देवाणघेवाण करण्यात आली. त्यामुळे रेल्वे व शासकीय मालमत्तेवरील गुन्ह्यांवर अधिक प्रभावी नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे.
११ अधिकारी, ५३ कर्मचारी मोहिमेत सहभागी
या संयुक्त कारवाईत पोलीस आणि RPF चे ११ अधिकारी, ५३ कर्मचारी तसेच जळगाव मुख्यालयातील तीन RCP प्लाटून सहभागी झाले होते. यामध्ये SDPO, प्रोबेशनरी DySP, पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक आणि RPF अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
पोलीस प्रशासनाने रेल्वे व शासकीय मालमत्तेची चोरी करणाऱ्यांविरुद्ध अशा धडक कारवाया यापुढेही सुरू राहतील, असा इशारा देत नागरिकांनी संशयास्पद हालचालींची माहिती तातडीने पोलिसांना देण्याचे आवाहन केले आहे.






