Other

अमळनेर उपविभागातून ३४.०८ लाखांचा मुद्देमाल मूळ मालकांना सुपूर्द !

पालकमंत्री गुलाबराव पाटील ,मंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय सावकारे यांच्याहस्ते वितरण

अमळनेर उपविभागातून ३४.०८ लाखांचा मुद्देमाल मूळ मालकांना सुपूर्द !

पालकमंत्री गुलाबराव पाटील ,मंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय सावकारे यांच्याहस्ते वितरण

अमळनेर | प्रतिनिधी

जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या ‘मुद्देमाल सुपूर्दगी’ मोहिमेंतर्गत शनिवार (दि. ११ जुलै २०२६) रोजी जळगाव येथील पद्मालय हॉलमध्ये भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. गुन्ह्यांची उकल झाल्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून जप्त करण्यात आलेला मुद्देमाल शक्य तितक्या लवकर मूळ मालकांच्या ताब्यात देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.अमळनेर उपविभागांतर्गत अमळनेर, पारोळा, एरंडोल आणि मारवड या पोलीस ठाण्यांनी मिळून ३४ लाख ८ हजार ४१५ रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने, ट्रॅक्टर, मोटारसायकल, रोख रक्कम आणि मोबाईल फोन मूळ मालकांच्या ताब्यात सुपूर्द केले. पोलिसांच्या या उपक्रमामुळे गुन्ह्यातील मालमत्ता तातडीने नागरिकांना परत मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन आणि वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे ,आमदार राजूमामा भोळे ,पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक (चाळीसगाव) अशोक नखाते, अप्पर पोलीस अधीक्षक (जळगाव) संदीप गावित तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी (अमळनेर) विनायक बाजीराव कोते यांची उपस्थिती होती.

अमळनेर पोलीस ठाण्याकडून २०.६७ लाखांचा मुद्देमाल परत

अमळनेर पोलीस ठाण्यातील विविध घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेले ७० ग्रॅम सोन्याचे दागिने (किंमत १० लाख ४६ हजार ४१५ रुपये), ७ लाख ३ हजार रुपयांची रोख रक्कम तसेच ३ लाख १८ हजार रुपयांचे २६ मोबाईल फोन असा एकूण २० लाख ६७ हजार ४१५ रुपयांचा मुद्देमाल संबंधित मूळ मालकांना सुपूर्द करण्यात आला.

पारोळा पोलीस ठाण्याकडून धार्मिक स्थळातील चोरीचा मुद्देमाल परत

पारोळा पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यात जप्त करण्यात आलेला मारुती मंदिरातील ५०० ग्रॅम वजनाचा चांदीचा मुकुट, १५० ग्रॅम वजनाच्या चांदीच्या मासळ्या तसेच १४ मोबाईल फोन असा एकूण ४ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल संबंधित मालकांच्या ताब्यात देण्यात आला.

एरंडोल पोलीस ठाण्याकडून ट्रॅक्टर व मोबाईल सुपूर्द

एरंडोल पोलीस ठाण्याने विविध गुन्ह्यांमध्ये हस्तगत केलेले स्वराज ७४४ एक्सटी, न्यू हॉलंड ३२३० आणि सोनालिका कंपनीचे ट्रॅक्टर तसेच तीन मोबाईल फोन असा एकूण ८ लाख ९७ हजार रुपयांचा मुद्देमाल मूळ मालकांना परत केला.

मारवड पोलीस ठाण्याकडून मोटारसायकल सुपूर्द

मारवड पोलीस ठाण्याच्या एका गुन्ह्यात जप्त करण्यात आलेली हिरो कंपनीची मोटारसायकल संबंधित मालकाच्या ताब्यात देण्यात आली.

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार

या कार्यक्रमात जिल्ह्यात उल्लेखनीय कामगिरी करणारे पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार आणि पोलीस पाटील यांचाही गौरव करण्यात आला. अमळनेर उपविभागातील मंगरूळ (ता. अमळनेर) येथील पोलीस पाटील भागवत बापू पाटील यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक २९९/२०२६ मध्ये केलेल्या विशेष सहकार्याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

जळगाव जिल्हा पोलीस दलाकडून राबविण्यात येणाऱ्या मुद्देमाल सुपूर्दगी मोहिमेमुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ होत असून, गुन्ह्यांची जलद उकल आणि मालमत्ता मूळ मालकांना वेळेत परत मिळावी, यासाठी जिल्हा पोलीस दल सातत्याने प्रयत्नशील असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button