Other

दहा वर्षांपासून शरीरात अडकलेला स्टेन्ट अन् ६ सेंटीमीटरचे दोन खडे; ७० वर्षीय वृद्धावर अवघ्या दोन टाक्यांत यशस्वी शस्त्रक्रिया

दहा वर्षांपासून शरीरात अडकलेला स्टेन्ट अन् ६ सेंटीमीटरचे दोन खडे; ७० वर्षीय वृद्धावर अवघ्या दोन टाक्यांत यशस्वी शस्त्रक्रिया

महादेव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या युरोलॉजी तज्ज्ञांची कामगिरी; महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत मोफत उपचार

जळगाव, प्रतिनिधी : मुतखड्याच्या उपचारादरम्यान शरीरात बसविण्यात आलेला स्टेन्ट तब्बल दहा वर्षे तसाच राहिल्याने निर्माण झालेली अत्यंत गुंतागुंत महादेव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथील युरोलॉजी तज्ज्ञांनी यशस्वीरीत्या दूर केली आहे. रावेर तालुक्यातील ७० वर्षीय वृद्ध रुग्णाच्या मूत्राशयाच्या परिसरात तयार झालेले प्रत्येकी सुमारे सहा सेंटीमीटर आकाराचे दोन मोठे खडे आणि दहा वर्षांपूर्वीचा जुना स्टेन्ट अत्याधुनिक शस्त्रक्रियेद्वारे बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले. विशेष म्हणजे, ही संपूर्ण शस्त्रक्रिया अवघ्या दोन टाक्यांमध्ये पार पडली असून महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत रुग्णावर मोफत उपचार करण्यात आले.

सुमारे दहा वर्षांपूर्वी या ७० वर्षीय वृद्धावर मुतखड्याची शस्त्रक्रिया झाली होती. त्यावेळी उपचाराचा भाग म्हणून मूत्रमार्गात स्टेन्ट बसविण्यात आला होता; मात्र शस्त्रक्रियेनंतर साधारण महिनाभराने तो काढणे गरजेचे असताना रुग्णाकडून तो काढण्याचे राहून गेले. परिणामी, तब्बल दशकभर हा स्टेन्ट शरीरातच राहिला आणि कालांतराने त्याभोवती मोठे खडे तयार होऊन रुग्णाला तीव्र त्रास सुरू झाला.

महादेव हॉस्पिटलमध्ये निदान व आधुनिक उपचार त्रास वाढल्यानंतर रुग्णाने महादेव हॉस्पिटलमधील युरोलॉजी विभागप्रमुख डॉ. हेमंत केळकर आणि डॉ. हर्षद चव्हाण यांच्याकडे तपासणी केली. आवश्यक वैद्यकीय तपासण्यांमध्ये मूत्राशयाच्या परिसरात प्रत्येकी सुमारे सहा सेंटीमीटर आकाराचे दोन मोठे खडे व जुना स्टेन्ट असल्याचे स्पष्ट झाले. रुग्णाचे वय आणि गुंतागुंत लक्षात घेऊन नियोजनपूर्वक शस्त्रक्रिया करण्यात आली.

त्यानुसार डॉक्टरांनी पीसीसीएलटी (पर्क्युटेनिअस सिस्टोलिथोट्रेप्सी) आणि पीसीएनएल (पर्क्युटेनिअस नेफ्रोलिथोट्रेप्सी) या अत्याधुनिक पद्धतींचा वापर करून दोन्ही मोठे खडे फोडून बाहेर काढले आणि दहा वर्षांपासून अडकलेला स्टेन्टही यशस्वीरीत्या काढला. केवळ दोन टाक्यांच्या साहाय्याने ही शस्त्रक्रिया करण्यात आली असून, सद्यस्थितीत रुग्णाची प्रकृती स्थिर व समाधानकारक आहे.

या तज्ज्ञ पथकाने केली शस्त्रक्रिया ही यशस्वी शस्त्रक्रिया महादेव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथील युरोलॉजी विभागप्रमुख डॉ. हेमंत केळकर, डॉ. हर्षद चव्हाण, डॉ. श्रीकांत रेड्डी, डॉ. शुभम चौधरी, डॉ. आर. के. तिवारी आणि डॉ. सुष्मीता रे यांच्या पथकाने पार पाडली.

वैद्यकीय सल्ला : “मूत्रमार्गातील स्टेन्ट हा कायमस्वरूपी उपचार नसतो. डॉक्टरांनी सांगितलेल्या कालावधीत तो काढणे किंवा बदलणे अत्यंत आवश्यक असते. स्टेन्ट काढण्यास विलंब झाल्यास त्यावर खडे तयार होणे, संसर्ग होणे तसेच मूत्रपिंडाच्या कार्यावर परिणाम होण्यासारख्या गुंतागुंती उद्भवू शकतात. त्यामुळे शस्त्रक्रियेनंतर नियमित तपासणी करावी आणि डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे.” — डॉ. हर्षद चव्हाण, महादेव हॉस्पिटल, जळगाव

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button