उष्मघाताने मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसदारांना मिळणार आर्थिक मदत


उष्मघाताने मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसदारांना मिळणार आर्थिक मदत
आ.एकनाथराव खडसे यांच्या पाठपुराव्याला यश
जळगाव प्रतिनिधी राज्यात वाढत्या उन्हाळ्यामुळे आणि उष्मघातामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या घटनांना गांभीर्याने घेत, आमदार एकनाथराव खडसे यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात व पत्रव्यवहाराद्वारे केलेल्या तीव्र पाठपुराव्याला अखेर मोठे यश आले आहे. शासनाने या मागणीची दखल घेत, ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी/भूमिहीन शेतमजूर/महिला शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना’ सुधारित स्वरूपात लागू केली असून, यामध्ये आता ‘उष्मघात’ मुळे होणाऱ्या मृत्यूचा समावेश करण्यात आला आहे. परिणामी, आता उष्मघाताने मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसदारांना सानुग्रह आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
काही महिन्यांपूर्वी राज्यातील अनेक भागांत, विशेषतः जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढल्यामुळे तीव्र उन्हाची लाट निर्माण झाली होती. या कडक उन्हामुळे अनेकांना उष्मघाताचा फटका बसून दुर्दैवी मृत्यू ओढवले होते. या गंभीर समस्येवर आवाज उठवत आमदार एकनाथराव खडसे यांनी विधिमंडळात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता तसेच शासनाला सविस्तर पत्रव्यवहार केला होता.
उन्हाळ्याच्या दिवसांत शासनाला दुपारी १२ ते ४ या वेळेत नागरिकांनी घराबाहेर पडू नये अशा मार्गदर्शक सूचना काढाव्या लागतात, मग केवळ तांत्रिक कारणास्तव उष्मघाताने मृत पावलेल्या गरिबांच्या वारसदारांना मदतीपासून वंचित ठेवणे अन्यायकारक आहे,” अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली होती. तसेच उष्मघाताचा समावेश आपत्ती श्रेणीत करून मृतांच्या वारसदारांना मदत द्यावी, अशी आक्रमक मागणी त्यांनी केली होती. यावर राज्य शासनाने सकारात्मक पावले उचलत १० सप्टेंबर २०२६ रोजी अधिकृत शासन निर्णय निर्गमित केला आहे.
कृषि विभागाने जारी केलेल्या नवीन शासन निर्णयानुसार, या योजनेची व्याप्ती वाढवून त्यात महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या आहेत. यानुसार शेती व्यवसाय किंवा उघड्यावर काम करताना उष्मघातामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या वारसदारांना आता या योजनेतून दोन लाख रुपये सानुग्रह अनुदान मिळणार असून यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. पूर्वी ही योजना केवळ ७/१२ वरील खातेदार शेतकरी कुटुंबातील एका व्यक्तीसाठी होती, परंतु आता यात परिवर्तन करून भूमिहीन शेतमजूर, महिला शेतकरी तसेच वहितीधारक खातेदार शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबातील सर्व कायदेशीर सदस्यांना याचा लाभ घेता येणार आहे.
याशिवाय अपघाती मृत्यू किंवा स्थायी अपंगत्व आल्यास दोन लाख रुपयांपर्यंतचे सानुग्रह अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली आहे. उष्मघातासारख्या घटकांना अधिकृत सुरक्षा कवचात सामावून घेतल्यामुळे जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी व शेतमजूर कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला असून, आमदार एकनाथराव खडसे यांनी केलेल्या या पाठपुराव्याचे सर्वत्र स्वागत होत आहे.







