अमळनेर पोलिसांचे धडक ‘कॉम्बिंग ऑपरेशन’; पिस्टल, तलवार जप्त, ११३ सराईतांची पडताळणी

अमळनेर पोलिसांचे धडक ‘कॉम्बिंग ऑपरेशन’; पिस्टल, तलवार जप्त, ११३ सराईतांची पडताळणी
दारूबंदी, जुगार, वाहतूक नियमभंग, ड्रंक अँड ड्राईव्हसह विविध प्रकारच्या १६० हून अधिक कारवाया
अमळनेर | प्रतिनिधी
कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अमळनेर पोलिसांनी विशेष ‘कॉम्बिंग ऑपरेशन’ राबवत मोठ्या प्रमाणावर धडक कारवाई केली. या मोहिमेत बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करत एक पिस्टल आणि एक तलवार जप्त करण्यात आली. तसेच दारूबंदी, जुगार, वाहतूक नियमभंग, सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, ड्रंक अँड ड्राईव्ह आदी विविध प्रकारच्या कारवायांमुळे गुन्हेगार व समाजकंटकांमध्ये मोठा धाक निर्माण झाला आहे.

या विशेष मोहिमेत उपविभागीय पोलीस अधिकारी (एसडीपीओ), अमळनेर पोलीस ठाण्यातील ७ अधिकारी व ६२ अंमलदार तसेच स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) जळगाव येथील १ अधिकारी व १० अंमलदार सहभागी झाले होते.
कॉम्बिंग ऑपरेशनदरम्यान आर्म ॲक्ट कलम ३/३५ अंतर्गत बेकायदा पिस्टल बाळगल्याप्रकरणी एक कारवाई, तर आर्म ॲक्ट कलम ४/२५ अंतर्गत तलवार बाळगल्याप्रकरणी एक कारवाई करण्यात आली. दारूबंदी कायद्यांतर्गत ९, जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत ५ कारवाया करण्यात आल्या.
पोलीस नोंदीत दोन किंवा अधिक गुन्हे दाखल असलेल्या ११३ संशयितांची पडताळणी करून त्यांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तसेच २५ हिस्ट्रीशीटर गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या ३२ जणांवर मुंबई पोलीस कायदा कलम ११२/११७ अन्वये कारवाई करण्यात आली.
याशिवाय कोटपा कायद्यांतर्गत ३, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २८५ अंतर्गत ७, मोटार वाहन कायद्यानुसार ३६, मोटार वाहन कायदा कलम ६६/१९२ अंतर्गत १, ड्रंक अँड ड्राईव्हच्या ३ आणि बनावट मॉडिफाइड सायलेन्सर वापरणाऱ्या वाहनांवर २ कारवाया करण्यात आल्या.
मोहिमेदरम्यान ६ बेपत्ता महिलांचा शोध घेण्यात आला. न्यायालयीन प्रक्रियेतील १५ अजामीनपात्र (NBW) वॉरंट, ६ जामीनपात्र (BW) वॉरंट आणि २१ समन्सची अंमलबजावणी करण्यात आली. तसेच १६ हॉटेल व लॉजेसची तपासणी करण्यात आली.
याशिवाय भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२६ व १२९ अन्वये २० आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या विशेष मोहिमेमुळे अमळनेर शहर व परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तीवर प्रभावी अंकुश ठेवण्यास मदत होणार असल्याचा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.







