धुळ्यात थरार : गुरुद्वारा प्रमुखांवर तलवारीने प्राणघातक हल्ला

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना आज धुळे शहरात घडली आहे. ज्याला आश्रय दिला, त्यानेच घात केल्याचा प्रकार मोहाडी येथील ऐतिहासिक गुरुद्वाऱ्यात समोर आला आहे. गुरुद्वाराचे प्रमुख बाबा धीरजसिंहजी यांच्यावर त्यांच्याच एका सेवकाने तलवारीने भीषण हल्ला केला असून या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज (सोमवारी) सकाळी ९:३० वाजण्याच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गालगत असलेल्या गुरुद्वाऱ्याच्या आवारात हा प्रकार घडला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बाबा धीरजसिंहजी नेहमीप्रमाणे खुर्चीवर बसून वर्तमानपत्र वाचत होते. त्यावेळी पाठीमागून आलेल्या हल्लेखोराने अचानक त्यांच्यावर तलवारीने वार करण्यास सुरुवात केली. डोके आणि मानेवर झालेल्या या वारांमुळे बाबा रक्ताच्या थारोळ्यात कोसळले.
यावेळी आरडाओरडा ऐकून रणबीर सिंग नावाचा दुसरा सेवक मदतीसाठी धावला असता, हल्लेखोराने त्यालाही जखमी केले. मात्र, उपस्थित इतर लोकांनी आणि सुरक्षा रक्षकांनी हल्लेखोराला जागीच पकडले.
‘विश्वासाचा’ रक्तरंजित शेवट
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, हल्लेखोर हा कोणताही सराईत गुन्हेगार नसून याच गुरुद्वाऱ्यात काम करणारा सेवक आहे. काही महिन्यांपूर्वीच त्याची हलाखीची परिस्थिती पाहून बाबा धीरजसिंहजी यांनी त्याला माणुसकीच्या नात्याने गुरुद्वाऱ्यात आश्रय आणि रोजगार दिला होता. मात्र, ज्या हातांनी त्याला आधार दिला, त्याच हातांवर त्याने आज शस्त्र उगारल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलिसांची तातडीची कारवाई
घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांनी फौजफाट्यासहित घटनास्थळी धाव घेतली. जखमी बाबांना आणि रणबीर सिंग यास तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. हल्लेखोर देखील झटापटीत जखमी झाला असून त्याच्यावर पोलीस बंदोबस्तात उपचार सुरू आहेत. संशयीत आरोपी मूळचा आडगाव (जि. नाशिक) येथील असून पोलीस त्याचे पार्श्वभूमी तपासत आहेत.
सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
येत्या ७ डिसेंबर २०२५ पासून गुरुद्वाऱ्यात श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी देश-विदेशातून मान्यवर येणार आहेत. या पार्श्वभूमीवर गुरुद्वारा प्रमुखांवरच असा प्राणघातक हल्ला झाल्याने धार्मिक स्थळांच्या आणि आगामी कार्यक्रमाच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास युद्धपातळीवर सुरू केला असून, सीसीटीव्ही फुटेज आणि आरोपीच्या मोबाईलची तपासणी केली जात आहे. हा हल्ला वैयक्तिक आकसातून झाला की यामागे काही मोठे षडयंत्र आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.






