Other

केळी बागेत रानडुकराचा हल्ला ; एकाच कुटुंबातील पाच जण जखमी

केळी बागेत रानडुकराचा हल्ला ; एकाच कुटुंबातील पाच जण जखमी

लोहारी शिवारातील घटना

पाचोरा : तालुक्यातील लोहारी शिवारात रानडुक्कराने केलेल्या अचानक हल्ल्यात एकाच कुटुंबातील पाच जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाच्या कार्यपद्धतीवर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लोहारी शिवारातील एका केळी बागेत मजूर काम करत असताना सकाळी साडेअकराच्या सुमारास अचानक रानडुक्कराने हल्ला चढवला. या हल्ल्यात राजेंद्र कुमावत (वय ५५), आशाबाई कुमावत (वय ५०), किशोर कुमावत (वय ३५), सपना कुमावत (वय ३०) तसेच रुचिता किशोर कुमावत (वय अंदाजे १०) हे गंभीर जखमी झाले.

घटनेनंतर जखमींना तातडीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. सतीश टाक यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी सर्व जखमींना शहरातील संजीवनी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या घटनेची माहिती प्रवीण पाटील यांनी वनविभागाला दिली असून ऑनलाइन तक्रारदेखील नोंदविण्यात आली आहे. मात्र, एवढी गंभीर घटना घडूनही वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी किंवा रुग्णालयात पोहोचले नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे.

दरम्यान, लोहारी शिवार परिसरात रानडुक्करांचा वाढता वावर नागरिकांसाठी धोक्याची घंटा ठरत असून वनविभागाने तातडीने उपाययोजना करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button