भडगावमध्ये पिण्याच्या पाण्याच्या टाकीत मुले पोहतानाचा व्हिडिओ; भाजप महिला मोर्चाचा नगरपालिकेला इशारा

भडगावमध्ये पिण्याच्या पाण्याच्या टाकीत मुले पोहतानाचा व्हिडिओ; भाजप महिला मोर्चाचा नगरपालिकेला इशारा
भडगाव (प्रतिनिधी )
शहरातील साकेत कॉलनी परिसरातील नवीन पिण्याच्या पाण्याच्या टाकीत काही मुले पोहत असल्याचा व्हिडिओ ५ ऑगस्ट रोजी समोर आल्यानंतर भडगावमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. शहराच्या पिण्याच्या पाणीपुरवठ्यासाठी वापरल्या जाणाऱ्या टाकीत झालेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा यांनी भडगाव नगरपालिकेच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
सदर पाण्याच्या टाकीतून शहरातील नागरिकांना पिण्याचे पाणी पुरवले जाते. अशा महत्त्वाच्या ठिकाणी काही मुले सहज प्रवेश करून पोहत असल्याची घटना समोर आल्याने सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी उघड झाल्याची चर्चा सुरू आहे. या घटनेमुळे नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्न निर्माण झाले असून, नगरपालिकेच्या देखरेखीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा योगीता अनिल वाघ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रशासनाकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी या घटनेची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
तसेच, पिण्याच्या पाण्याच्या टाकीतील पाण्याची गुणवत्ता तातडीने तपासून त्याचा अहवाल नागरिकांसमोर जाहीर करावा, अशीही त्यांची मागणी आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी पाण्याच्या टाकीवर कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक नियुक्त करावेत तसेच परिसरात CCTV कॅमेरे बसवून प्रभावी सुरक्षा व्यवस्था उभारावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. दरम्यान, प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन आवश्यक उपाययोजना केल्या नाहीत, तर भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा यांच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा योगीता अनिल वाघ यांनी दिला आहे. या घटनेमुळे शहरातील नागरिकांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात असून, आता प्रशासन या प्रकरणावर कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







