Crime

ब्रेकिंग : ग्रामपंचायत अधिकाऱ्याला लाच घेताना सिनेस्टाईल अटक

महा पोलीस न्यूज । दि.२० मे २०२५ । धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) यशस्वी सापळा कारवाई करत एका ग्रामपंचायत अधिकाऱ्याला लाच घेताना अटक केली आहे. दिनेश वासुदेव साळुंखे (वय ५३), असे या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव असून ते जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील तामसवाडी ग्रामपंचायतीत ग्रामपंचायत अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार एक शासकीय बांधकाम ठेकेदार असून त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत तामसवाडी ग्रामपंचायतीमध्ये पाच लाख रुपये किमतीचे रस्ता कॉंक्रिटीकरणाचे काम पूर्ण केले होते. या कामाच्या चार लाख रुपयांच्या बिलाचा चेक मिळाल्यानंतर, तक्रारदार दुसऱ्या कामाच्या चौकशीसाठी ग्रामपंचायत कार्यालयात गेले होते. त्यावेळी ग्रामपंचायत अधिकारी दिनेश साळुंखे यांनी तक्रारदाराकडे पूर्वी दिलेल्या बिलाच्या रकमेच्या १० टक्के म्हणजेच ४० हजार रुपये लाचेची मागणी केली होती.

पाठलाग करून घेतले ताब्यात
तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे यांच्याकडे दूरध्वनीद्वारे माहिती दिली. त्यानुसार, १९ मे रोजी धुळे एसीबीच्या पथकाने पारोळा येथे जाऊन तक्रारदाराची भेट घेतली आणि त्यांची तक्रार नोंदवून घेतली. याच दिवशी पडताळणी केली असता, दिनेश साळुंखे यांनी तक्रारदाराकडे ४० हजार रुपयांची लाच मागितली आणि ती अमळनेर येथे दगडी दरवाजासमोर, राजे संभाजी चौकात स्वतः स्वीकारली. लाच घेतल्यानंतर ते दुचाकीवरून पळून गेले, परंतु पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले.

अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल
संशयित आरोपी दिनेश साळुंखे यांच्याविरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. घटनास्थळावरून आरोपीचा मोबाईल ताब्यात घेण्यात आला असून, पुढील तपासणी केली जाणार आहे. या सापळा कारवाईसाठी पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक रूपाली खांडवी या तपास करीत आहेत.

नागरिकांना आवाहन
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास त्यांनी तात्काळ धुळे येथील कार्यालयाशी संपर्क साधावा. अथवा संपर्क क्रमांक: ०२५६२-२३४०२० किंवा टोल फ्री क्रमांक १०६४ यावर संपर्क साधावा.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button