OtherSocial

गोवंश कत्तल प्रकरणाचा संपूर्ण तपास करा; विश्व हिंदू परिषद-बजरंग दलाची मागणी

गोवंश कत्तल प्रकरणाचा संपूर्ण तपास करा; विश्व हिंदू परिषद-बजरंग दलाची मागणी

मुख्य सूत्रधाराचा शोध घेऊन संपूर्ण रॅकेट उघड करण्याची मागणी; कारवाई न झाल्यास जनआक्रोश मोर्चा व आमरण उपोषणाचा इशारा

अमळनेर | प्रतिनिधी

अमळनेर शहरात ३ जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) उघडकीस आणलेल्या कथित बेकायदेशीर गोवंश कत्तल प्रकरणाच्या तपासात अनेक बाबींचा सखोल शोध घेण्याची गरज असल्याचे म्हणत विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल, अमळनेर यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक, मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष यांना निवेदन सादर करण्यात आले. या प्रकरणातील संपूर्ण साखळीचा तपास करून संबंधित सर्व जबाबदार व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली.

संपूर्ण रॅकेट उघड करण्याची मागणी

निवेदनात घटनास्थळी आढळलेल्या व्यक्तींवरील कारवाईपुरते प्रकरण मर्यादित न ठेवता, या व्यवसायामागील मुख्य सूत्रधार, आर्थिक लाभार्थी, वाहतूक साखळी आणि संबंधित सर्व व्यक्तींची चौकशी करून संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करण्याची मागणी करण्यात आली आहे.

कातड्यांच्या साठ्याची स्वतंत्र चौकशी व्हावी

घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गोवंशांच्या कातड्यांचा साठा आढळल्याचा दावा करत त्याचा स्वतंत्र पंचनामा करून जप्ती, उगम, वाहतूक आणि साठवणुकीची चौकशी करावी तसेच आवश्यकतेनुसार स्वतंत्र गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

कत्तलखान्याच्या कामकाजाची चौकशी करण्याची मागणी

नगरपरिषदेच्या अधिकृत कत्तलखान्यात परवानगीच्या अटींचे पालन होत आहे का, याची निष्पक्ष चौकशी करावी. नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित अधिकारी व जबाबदार व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

तपासाबाबत उपस्थित केले प्रश्न

एलसीबीने कारवाई केल्यानंतर पुढील तपास स्थानिक पोलिसांकडे का वर्ग करण्यात आला, घटनास्थळी ताब्यात घेतलेल्या व्यक्ती आणि गुन्ह्यातील नोंदीतील व्यक्तींमध्ये तफावत का दिसते, तसेच इतर संशयितांचा शोध व तपास कोणत्या टप्प्यावर आहे, अशा विविध मुद्द्यांवर निवेदनातून प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. या सर्व बाबींची वरिष्ठ स्तरावर निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

आंदोलनाचा इशारा

या प्रकरणात तातडीने प्रभावी कारवाई झाली नाही किंवा तपासात विलंब झाल्यास विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने जनआक्रोश मोर्चा, आमरण उपोषण तसेच लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

हजाराहून अधिक स्वाक्षऱ्यांसह निवेदन

प्रखंड अध्यक्ष डॉ. संजय शाह, प्रखंड मंत्री सचिन चौधरी, प्रखंड संयोजक सचिन महाजन यांच्यासह विश्व हिंदू परिषद-बजरंग दलाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि एक हजाराहून अधिक नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांसह हे निवेदन प्रशासनाकडे सादर करण्यात आले.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button