साने गुरुजी स्मृती सप्ताह व कर्मयोगी वासुदेव गुरुजी स्मृतिदिनानिमित्त गुणगौरव यशोत्सव उत्साहात

साने गुरुजी स्मृती सप्ताह व कर्मयोगी वासुदेव गुरुजी स्मृतिदिनानिमित्त गुणगौरव यशोत्सव उत्साहात
विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा सन्मान
भुसावळ (प्रतिनिधी) : आपले परिवार सार्वजनिक वाचनालय, भुसावळतर्फे साने गुरुजी स्मृती सप्ताह आणि कर्मयोगी वासुदेव गुरुजी स्मृतिदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला ‘गुणगौरव यशोत्सव – उत्सव गुणवत्तेचा’ व पुरस्कार वितरण सोहळा डॉ. बी. व्ही. खाचणे सभागृहात उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधान परिषद सदस्य आमदार एकनाथराव खडसे होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, डॉ. केतकी पाटील, आमदार अमोल जावळे, लोढा ग्रुपचे डेप्युटी सीईओ तुषार येवले, डॉ. पंकज पाटील, प्रभारी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे, महेश फालक, पी. व्ही. पाटील, गणेश नेहते, ललित पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी माता शारदा, श्री गजानन महाराज, साने गुरुजी व कर्मयोगी वासुदेव गुरुजी यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कु. नुपूर भालेराव यांच्या गणेशवंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविकात शांताराम पाटील गुरुजी यांनी वाचनालयाच्या कार्याचा आढावा घेतला.
या निमित्ताने ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह आणि पॅड देऊन गौरव करण्यात आला. तसेच शिक्षण, सामाजिक, सांस्कृतिक व विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना कर्मयोगी वासुदेव गुरुजी गौरव पुरस्कार २०२६ प्रदान करण्यात आले.
यामध्ये संस्थात्मक, प्राध्यापक, उपप्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, जीवन गौरव आणि युवा गौरव अशा विविध गटांतील पुरस्कारांचा समावेश होता. पुरस्कारार्थींना शाल, स्मृतिचिन्ह आणि ‘हितगुज’ या पुस्तकाची प्रत देऊन सन्मानित करण्यात आले.
मनोगत व्यक्त करताना तुषार येवले यांनी जीवनातील यशामागे चांगल्या मित्रांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगितले. माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी कर्मयोगी वासुदेव गुरुजी यांच्या कार्यातून समाजाला प्रेरणा मिळत असल्याचे नमूद केले.
अध्यक्षीय भाषणात आमदार एकनाथराव खडसे यांनी कर्मयोगी वासुदेव गुरुजी यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव करताना, त्यांनी घडविलेल्या पिढ्यांमुळे समाज समृद्ध झाल्याचे सांगितले. तसेच आपले परिवार सार्वजनिक वाचनालयाच्या उपक्रमांचे कौतुक करून भविष्यातही सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा लोखंडे, अशा पाटील आणि येवले यांनी केले. आभार प्रदर्शन शैलेंद्र महाजन यांनी केले. स्नेहभोजनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.






