
भाजप चोपडा ग्रामीण मंडळातर्फे जागतिक योग दिन उत्साहात साजरा
चोपडा | प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा करण्यात येणारा जागतिक योग दिन चोपडा तालुक्यातही उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. भारतीय जनता पार्टी चोपडा ग्रामीण पूर्व मंडळाच्या वतीने अडावद येथील सार्वजनिक विद्यालयात योग दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी उपस्थितांनी विविध योगासने व प्राणायाम करून योगाचे महत्त्व अधोरेखित केले. योग हा केवळ व्यायाम नसून शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्याचा पाया असल्याचे मान्यवरांनी यावेळी सांगितले. हिमालयापासून हिंद महासागरापर्यंत आणि ईशान्य भारतापासून सौराष्ट्रापर्यंत संपूर्ण देश आज योगमय झाला असून, २१ जूनचा दिवस जगाला एकत्र आणणारा जागतिक उत्सव बनल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
कार्यक्रमाला भाजप चोपडा ग्रामीण पूर्व मंडळाचे अध्यक्ष पिंटू पावरा, भाजप जळगाव जिल्हा पूर्व उपाध्यक्ष हनुमंत महाजन, शक्तीकेंद्र प्रमुख संदीप महाजन यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
तसेच सार्वजनिक विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेत योगाभ्यास केला. कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये योगाविषयी जागरूकता निर्माण करण्यात आली तसेच निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विद्यालय प्रशासनाने विशेष परिश्रम घेतले.





