Crime

चोपड्यात वेश्याव्यवसाय रॅकेट उद्ध्वस्त : पाच महिलांची सुटका, दोन ताब्यात, ९ फरार

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । चोपडा शहर पोलिसांनी अनैतिक मानवी व्यापाराविरोधात धडक कारवाई करत शहरातील एका ठिकाणी सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पाच महिलांची सुटका करण्यात आली असून दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. तर या प्रकरणातील इतर संशयित आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत करण्यात आली आहेत.

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, चोपडा शहरातील प्रताप हायस्कूलच्या मागील बाजूस, तहसील कार्यालयाच्या परिसरामागे स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या एका ठिकाणी महिलांना आश्रय देऊन त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीची पडताळणी केल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या पथकातील पोलिसांनी नियोजनबद्ध पद्धतीने छापा टाकण्याची कारवाई केली.

दि.२९ मे रोजी सायंकाळी करण्यात आलेल्या या कारवाईदरम्यान संबंधित ठिकाणी महिलांचा वापर करून अनैतिक व्यवसाय चालविला जात असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत घटनास्थळावरून पाच महिलांची सुटका केली. या महिलांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले असून त्यांना आवश्यक कायदेशीर मदत, समुपदेशन व संरक्षण उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

प्राथमिक चौकशीत सुटका करण्यात आलेल्या महिलांपैकी काही महिला राजस्थान तसेच नेपाळ येथील असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणाचा मानवी तस्करीशी काही संबंध आहे का, याचाही तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. महिलांना कोणत्या माध्यमातून येथे आणण्यात आले, त्यांना व्यवसायासाठी भाग पाडण्यात आले होते का आणि या रॅकेटचे जाळे इतर भागातही विस्तारले आहे का, याबाबत तपास यंत्रणा माहिती गोळा करत आहे.

या प्रकरणी चोपडा शहर पोलिस ठाण्यात अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम, १९५६ मधील विविध कलमांसह भारतीय न्याय संहितेतील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान महिलांना आश्रय उपलब्ध करून देणे, आर्थिक फायद्यासाठी त्यांचा वापर करणे तसेच अनैतिक व्यवसायास प्रोत्साहन देणे यांसारख्या गंभीर बाबी समोर आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

कारवाईनंतर पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांची सखोल चौकशी सुरू आहे. या चौकशीतून रॅकेटशी संबंधित इतर व्यक्ती, आर्थिक व्यवहार, ग्राहकांची माहिती तसेच या व्यवसायामागील मुख्य सूत्रधारांबाबत महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, फरार ९ संशयीत आरोपींच्या अटकेसाठी विशेष पथके विविध ठिकाणी शोधमोहीम राबवत आहेत.

अनैतिक मानवी व्यापार, महिलांचे शोषण आणि वेश्याव्यवसायासारख्या गुन्ह्यांविरुद्ध पोलिस प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, नागरिकांनीही अशा संशयास्पद हालचाली, महिलांचे शोषण, मानवी तस्करी किंवा अनैतिक व्यवसायासंदर्भातील कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांच्या सहकार्यामुळे अशा गुन्हेगारी कारवायांवर अधिक प्रभावीपणे अंकुश ठेवणे शक्य होणार असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button