धरणगावात चोरट्यांचा हैदोस; बंद घर फोडून पावणे दोन लाखाचे सोने आणि रोख रक्कम लंपास

धरणगावात चोरट्यांचा हैदोस; बंद घर फोडून पावणे दोन लाखाचे सोने आणि रोख रक्कम लंपास
मातोश्री नगरमधील घटना; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल
धरणगाव प्रतिनिधी अज्ञात चोरट्यांनी एका सेवानिवृत्त मुख्याध्यापकाचे घर लक्ष्य करत सुमारे पावणेदोन लाखांची घरफोडी केली आहे. ही घटना दि. १७ ते १८ जून दरम्यानच्या मध्यरात्री घडली.
फिर्यादी मधुकर कृष्णा महाजन (वय ६६) हे घरात नसताना चोरट्यांनी ही संधी साधली. चोरट्यांनी कपाटातील ४० हजार रुपये रोख, १ लाख ४४ हजार रुपये किमतीची ३५ ग्रॅम सोन्याची पोत आणि ५ हजार रुपयांचे चांदीचे दागिने चोरून नेले.
फिर्यादी महाजन यांनी दिलेल्या तक्रारीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५(अ), ३३१(३), ३३१(४) प्रमाणे घरफोडीचा गुन्हा (गु.र.नं. २३१/२०२६) दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या अनुषंगाने सूचना दिल्या असून पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड पुढील तपास करत आहेत.






