चेक बाऊन्स प्रकरणी रेल्वे कर्मचाऱ्याला ६ महिने कारावास; २ लाख २० हजार भरपाई


चेक बाऊन्स प्रकरणी रेल्वे कर्मचाऱ्याला ६ महिने कारावास; २ लाख २० हजार भरपाई
भडगाव (प्रतिनिधी)
हातउसने घेतलेले पैसे परत न करता दिलेला धनादेश बाऊन्स झाल्याप्रकरणी भडगाव न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. पराक्रम्य संलेख अधिनियम कलम १३८ अन्वये दाखल खटल्यात रेल्वे कर्मचारी आरोपी विशाल पगारे याला दोषी ठरवत ६ महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा तसेच २ लाख २० हजार रुपये भरपाई देण्याचे आदेश न्यायमूर्ती राजळे यांनी दिले. महिंदळे, ता. भडगाव, जि. जळगाव येथील रहिवासी मधुकर राजाराम खैरनार यांच्याकडून आरोपी विशाल शिवाजी पगारे, रा. मेगा सिटी, भडगाव, याने घर घेण्यासाठी १ लाख ७० हजार रुपये हातउसने घेतले होते. ही रक्कम परत करण्यासाठी आरोपीने दिलेला धनादेश बँकेत वटला नाही. पैसे परत न मिळाल्याने मधुकर खैरनार यांनी अॅड. भरत रमेश ठाकरे यांच्यामार्फत भडगाव न्यायालयात एस.एस.सी. ८०/२०२१ हा खटला दाखल केला होता. या प्रकरणातील पुरावे व कागदपत्रांची पडताळणी तसेच अॅड. भरत ठाकरे यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला फौजदारी प्रक्रिया संहिता कलम २५५ (२) अन्वये दोषी ठरवले. न्यायालयाच्या आदेशानुसार आरोपी विशाल पगारे याला ६ महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच धनादेशाची मूळ रक्कम १ लाख ७० हजार रुपये आणि नुकसानभरपाई म्हणून ५० हजार रुपये, अशी एकूण २ लाख २० हजार रुपये रक्कम आदेशाच्या तारखेपासून दोन महिन्यांच्या आत फिर्यादीस देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही रक्कम निर्धारित मुदतीत न दिल्यास आरोपीला आणखी दोन महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे. या खटल्यात फिर्यादी मधुकर खैरनार यांच्या बाजूने अॅड. भरत रमेश ठाकरे यांनी कामकाज पाहिले.






