डांभुर्णीच्या भरचौकात हवेत गोळीबार; सरपंचाला अटक
गावठी पिस्तूल, मॅगझीन व जिवंत काडतूस जप्त; दहशत निर्माण करण्यासाठी फायरिंग केल्याची कबुली


डांभुर्णीच्या भरचौकात हवेत गोळीबार; सरपंचाला अटक
गावठी पिस्तूल, मॅगझीन व जिवंत काडतूस जप्त; दहशत निर्माण करण्यासाठी फायरिंग केल्याची कबुली
यावल | प्रतिनिधी : यावल तालुक्यातील डांभुर्णी येथे भरचौकात गावठी पिस्तुलातून हवेत गोळीबार करून दहशत निर्माण करणाऱ्या कोळन्हावी ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंचाला यावल पोलिसांनी अटक केली आहे. विकास उर्फ गोटू जगन्नाथ सोळंके (वय ३७, रा. कोळन्हावी, ता. यावल) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून गावठी बनावटीचे पिस्तूल, मॅगझीन आणि एक जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले आहे.
दि. २७ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ८ वाजता डांभुर्णी गावातील चौकात गावठी कट्ट्यातून हवेत गोळीबार करण्यात आल्याची माहिती यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळाली. त्यानंतर पोलीस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. किनगाव रोडलगत शिवसम्राट सोयाबीन बिर्याणी दुकानाजवळ नुकत्याच फायर केलेल्या राऊंडची रिकामी पुंगळी आढळून आली.
दुकानदार व स्थानिक नागरिकांकडे चौकशी केली असता विकास उर्फ गोटू सोळंके याने गोळीबार केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. घटनास्थळी मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनला पाचारण करून रिकामी पुंगळी तसेच इतर भौतिक पुरावे जप्त करण्यात आले.
गोळीबार केल्यानंतर संशयित जळगावच्या दिशेने गेल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन व पोलीस कर्मचारी सचिन पाटील यांना त्याच्या शोधासाठी जळगावला पाठविण्यात आले. तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे यांच्या पथकानेही शोधमोहीम राबवली.
संयुक्त पथकाने रात्री सुमारे १ वाजता कालंका माता मंदिर परिसरातून विकास उर्फ गोटू सोळंके याला ताब्यात घेतले.
पोलिसांच्या चौकशीत संशयिताने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. डांभुर्णी येथील काही मुले त्याच्या कोळन्हावी परिसरातील हॉटेल, बिअर बार व परमिट रूममध्ये येऊन मोबाईलवर व्हिडिओ काढून त्रास देत होती. याच कारणावरून २६ ऑगस्ट रोजी त्यांच्यासोबत वाद झाला होता.
या वादातून संबंधित मुलांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने २७ ऑगस्ट रोजी डांभुर्णी येथे जाऊन हवेत गोळीबार केल्याची कबुली त्याने दिल्याचे पोलिसांनी नमूद केले
गोळीबारासाठी वापरलेले पिस्तूल कोळन्हावी गावाच्या शिवारातील स्वतःच्या मालकीच्या आदर्श हॉटेलजवळील शेतात लपवून ठेवल्याची माहिती संशयिताने दिली. त्यानुसार पोलिसांनी तेथून गावठी बनावटीचे पिस्तूल, मॅगझीन आणि एक जिवंत काडतूस जप्त केले.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १२५ तसेच भारतीय हत्यार कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मैनुद्दीन सय्यद करीत आहेत.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, पोलीस उपनिरीक्षक मैनुद्दीन सय्यद, पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन, सफौ हेमंत सांगळे, पोहेकॉ रोहिल गणेश, पोका हितेश बागुल, सचिन पाटील, अनिल साळुंखे, चालक संतोष पाटील तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.







