धरणगाव तालुक्यात नाला खोलीकरण मोहिमेला पहिल्याच पावसात यश; शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण

धरणगाव तालुक्यात नाला खोलीकरण मोहिमेला पहिल्याच पावसात यश; शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण
जळगाव : यंदा पाऊस कमी होण्याच्या शक्यतेचा अंदाज लक्षात घेऊन संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी राबविण्यात आलेल्या नाला खोलीकरण मोहिमेला पहिल्याच दमदार पावसानंतर मोठे यश मिळाल्याचे चित्र धरणगाव तालुक्यात दिसून आले आहे. या उपक्रमामुळे परिसरातील नाले, पाझर तलाव आणि बंधारे तुडुंब भरून वाहू लागले असून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या संकल्पनेतून आणि लोकसहभागातून ही मोहीम राबविण्यात आली होती. गेल्या सहा ते सात महिन्यांपासून तालुक्यात नाल्यांचे खोलीकरण आणि रुंदीकरणाची कामे युद्धपातळीवर सुरू होती. यासाठी देशातील मोठ्या नदीजोड प्रकल्पांवर काम केलेल्या यश इंजिनिअरिंग कन्सल्टन्सीमार्फत अत्याधुनिक तांत्रिक सर्वेक्षण करण्यात आले. प्रत्येक नाल्याचा नैसर्गिक उतार, जलप्रवाह आणि पाणी साठवण क्षमता विचारात घेऊन सुमारे ३१० किलोमीटर लांबीचे नाला खोलीकरण पूर्ण करण्यात आले.
पहिल्याच पावसात हे जलस्रोत पूर्ण क्षमतेने भरल्याने सिंचनाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटण्यास मदत झाली आहे. तसेच या जलसंधारणाच्या कामांमुळे भूजल पातळी वाढण्यासही हातभार लागणार असून विहिरी आणि कूपनलिकांच्या पाणीपातळीत सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. याचा थेट लाभ हजारो हेक्टर शेतीला होणार असल्याने रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
पूर्वी मुसळधार पावसात नाल्यांचे पाणी शेतात घुसून पिकांचे मोठे नुकसान होत असे. मात्र, यंदा नाल्यांचे खोलीकरण व रुंदीकरण झाल्यामुळे पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने झाला असून शेतातील पिकांचे नुकसान टळल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, या जलसंधारण कामांच्या पार्श्वभूमीवर प्रतापराव गुलाबराव पाटील यांनी जलपूजन करून समाधान व्यक्त केले. गेल्या अनेक वर्षांत न झालेली कामे या उपक्रमातून पूर्ण झाल्याची भावना व्यक्त करत परिसरातील शेतकऱ्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांचे आभार मानले आहेत.






