Other

१ लाख २८ हजार लिटर बायो डिझेलची अवैध वाहतूक उघडकीस

तीन टँकरसह २ कोटी १७ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त; तिघे चालक अटकेत

१ लाख २८ हजार लिटर बायो डिझेलची अवैध वाहतूक उघडकीस

तीन टँकरसह २ कोटी १७ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त; तिघे चालक अटकेत

नंदुरबार : गुजरात राज्यातून विसरवाडीमार्गे धुळ्याच्या दिशेने होणाऱ्या बायो डिझेलच्या कथित अवैध वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली. तीन टँकरमधून तब्बल १ लाख २८ हजार लिटर बायो डिझेल वाहतूक होत असल्याचे तपासणीत निष्पन्न झाले. पोलिसांनी बायो डिझेलसह तीन टँकर आणि तीन मोबाईल असा एकूण २ कोटी १७ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत तीन टँकर चालकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

गुप्त माहितीच्या आधारे सापळा

दिनांक ८ ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुजरात राज्यातून विसरवाडीमार्गे बायो डिझेलची अवैध वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी पथक तयार करून माहितीची खात्री करून कारवाई करण्याचे आदेश दिले.

तीन टँकर संशयास्पदरीत्या आढळले

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विसरवाडी पोलीस ठाणे हद्दीतील महामार्ग पोलीस मदत केंद्राजवळ सापळा रचला. रात्री सुमारे ११.३० वाजता विसरवाडीच्या दिशेने धुळ्याकडे जाणारे पांढऱ्या रंगाचे तीन टँकर एकापाठोपाठ येताना दिसले. पोलिसांनी तिन्ही वाहने थांबवून चालकांकडे चौकशी केली. मात्र, समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने वाहनांची तपासणी करण्यात आली.

तपासणीत बायो डिझेलची वाहतूक निष्पन्न

टँकरमध्ये बायो डिझेल असल्याचा संशय आल्याने पुरवठा विभाग, नवापूर तसेच नंदुरबार येथील फॉरेन्सिक पथकाच्या माध्यमातून तपासणी करण्यात आली. या तपासणीत तिन्ही टँकरमधून बायो डिझेलची वाहतूक होत असल्याचे निष्पन्न झाले.

२ कोटी १७ लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी तिन्ही टँकरमधील सुमारे १ लाख २८ हजार लिटर बायो डिझेल, ज्याची किंमत १ कोटी २ लाख ४० हजार रुपये, तसेच बायो डिझेल वाहतुकीसाठी वापरलेले १ कोटी १५ लाख २० हजार रुपये किमतीचे तीन टँकर आणि ३० हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल असा एकूण २ कोटी १७ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

या प्रकरणी टँकर चालक बाबुलाल नरसिंगराम बिष्णोई (४९, रा. भूनिया, ता. सेंडवा, जि. बाडमेर, राजस्थान), गुमानराम रुपाराम जाट (३८, रा. दिनगड, ता. चौथान, जि. बाडमेर, राजस्थान) आणि संतोष रोधेश्याम सिंग (३६, रा. पुरा हरलाल, ता. बाह, जि. आग्रा, उत्तर प्रदेश) यांच्याविरुद्ध विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि जयेश खलाने, विसरवाडी पोलीस ठाणे करीत आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

ही कारवाई नंदुरबार जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक अश्विनी सानप आणि अपर पोलीस अधीक्षक अशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, विकास गुंजाळ, सहायक पोलीस उपनिरीक्षक राकेश वसावे, पोलीस हवालदार मुकेश तावडे, मोहन ढमढेरे तसेच पोलीस अंमलदार रामेश्वर चव्हाण, अभय राजपूत, मनोज महाजन, विनोद पाटील आणि रविंद्र अहिरे यांच्या पथकाने केली.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button