Other

चाळीसगावातील घरफोडीचा गुन्हा उघडकीस

चाळीसगावातील घरफोडीचा गुन्हा उघडकीस

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; संशयित आरोपीकडून ४० हजारांची रोकड जप्त

चाळीसगाव : शहरातील घरफोडी करून ८० हजार रुपये चोरल्याच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावला आहे. या कारवाईत संशयित आरोपी नदीमशहा लियाकतशहा याला चाळीसगाव शहरातील घाट रोड, विष्णू पार्क परिसरातून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून ४० हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

घराच्या मागील बाजूने प्रवेश करून चोरी

३१ जुलै २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेदरम्यान घराच्या मागील भिंतीच्या पत्र्यातून प्रवेश करून घरातील स्टीलच्या डब्यात ठेवलेले ८० हजार रुपये चोरीला गेल्याची फिर्याद ३ ऑगस्ट रोजी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. फिर्यादीने नदीमशहा लियाकतशहा व त्याच्यासोबतच्या इतर व्यक्तींवर चोरीचा संशय व्यक्त केला होता.

याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३६९/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०५, ३३१(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

स्थानिक गुन्हे शाखेने सुरू केला शोध

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेची विविध पथके तयार करून संशयित आरोपीचा शोध सुरू करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून आरोपी जाळ्यात

दरम्यान, पथकाला विश्वसनीय गोपनीय बातमीदारामार्फत नदीमशहा लियाकतशहा हा चाळीसगाव शहरातील घाट रोड, विष्णू पार्क परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी परिसरात सापळा रचून संशयित आरोपीला ताब्यात घेतले.

अंगझडतीत ४० हजारांची रोकड

पंचांसमक्ष आरोपीची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून ४० हजार रुपये रोख मिळून आले. या रकमेबाबत पोलिसांनी कसून चौकशी केली असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याकडून मिळालेली रोकड ही याच घरफोडीतील चोरीची रक्कम असल्याचेही त्याने कबूल केल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

जप्त करण्यात आलेली रोकड आणि आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पथकाची उल्लेखनीय कामगिरी

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

कारवाईत पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील, पोलीस कॉन्स्टेबल महेश पाटील, सागर पाटील आणि भुषण शेलार यांचा समावेश होता. पथकाने केलेल्या या कारवाईचे कौतुक होत आहे.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button