शनीपेठ पोलिसांची धडक कारवाई; देशी बनावटीचे पिस्तूल जप्त

शनीपेठ पोलिसांची धडक कारवाई; देशी बनावटीचे पिस्तूल जप्त
दोन जिवंत काडतुसेही हस्तगत; अवैध शस्त्र बाळगणाऱ्यास अटक
जळगाव : शहरात अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात शनीपेठ पोलिसांनी धडक कारवाई केली. स्मशानभूमीजवळील उमेश बियर शॉपी परिसरात सापळा रचून एका इसमास ताब्यात घेत त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.
गोपनीय माहितीवरून पोलिसांची कारवाई
जळगाव जिल्ह्यात अवैधरित्या घातक शस्त्रे व अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या व्यक्तींविरोधात प्रभावी कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.त्यानुसार शनीपेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विशाल जयस्वाल यांनी आपल्या अधिपत्याखालील अधिकारी व कर्मचाऱ्यांना गोपनीय माहिती संकलित करून अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
उमेश बियर शॉपीजवळ संशयित ताब्यात
१० ऑगस्ट रोजी शनीपेठ पोलीस ठाणे हद्दीतील स्मशानभूमीजवळील उमेश बियर शॉपी परिसरात एक इसम अवैध अग्निशस्त्र घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. माहितीची पडताळणी करून पोलीस पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली यावेळी प्रकाश तोलार (रा. खेडी, ता. जळगाव, ह.मु. साई सिटी, जळगाव) याला ताब्यात घेण्यात आले.
पिस्तूल व काडतुसे जप्त
पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी हा शस्त्रसाठा जप्त केला आहे.
या प्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १७२/२०२६ दाखल करण्यात आला असून, आर्म्स अॅक्ट कलम ३/२५(१-B)(a) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांच्या पथकाची उल्लेखनीय कामगिरी
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
कारवाईत पोलीस उपनिरीक्षक संतोष खेडेकर, परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक अभिषेक कटारे, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक नितीन पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय खैरे, योगेश जाधव, पोलीस नाईक महेंद्र पाटील, पराग दुसाने तसेच पोलीस कॉन्स्टेबल अमोल वंजारी, निलेश घुगे, गणेश ढाकणे आणि योगेश साबळे यांच्या पथकाचा सहभाग होता.







