Crime

शेअर मार्केट ट्रेडिंगच्या नावाखाली २३ कोटींचा घोटाळा; ‘TWJ असोसिएट्स’चे संचालक दाम्पत्य जळगाव पोलिसांच्या ताब्यातl

शेअर मार्केट ट्रेडिंगच्या नावाखाली २३ कोटींचा घोटाळा; ‘TWJ असोसिएट्स’चे संचालक दाम्पत्य जळगाव पोलिसांच्या ताब्यात

​जळगाव: शेअर मार्केट ट्रेडिंगच्या नावाखाली प्रचंड परताव्याचे आमिष दाखवून राज्यभरातील शेकडो गुंतवणूकदारांची तब्बल २३ कोटी ८१ लाख ७२ हजार ५३० रुपयांची फसवणूक करणाऱ्या ‘TWJ असोसिएट्स प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीच्या मुख्य संचालक दाम्पत्याला जळगाव पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अखेर अटक केली आहे. मुख्य संचालक समीर सुभाष नार्वेकर आणि त्याची पत्नी नेहा समीर नार्वेकर यांना ठाणे मध्यवर्ती कारागृहातून ताब्यात घेऊन जळगावात आणण्यात आले असून न्यायालयाने त्यांना २९ जून २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील आणखी धक्कादायक बाब म्हणजे सुरुवातीला तक्रारदार म्हणून समोर आलेला जळगाव शाखेचा फ्रँचायझी चालक मिलींद पाटील हाच या फसवणूक रॅकेटमधील मुख्य एजंट आणि कमिशनखोर असल्याचे पोलीस चौकशीत निष्पन्न झाले आहे.

​आर्थिक गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी समीर नार्वेकर (वय ३५) व नेहा नार्वेकर (वय ३६, रा. गिमवी, ता. गुहागर, जि. रत्नागिरी) यांनी TWJ इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट प्रा. लि.चे संचालक संकेश रामकृष्ण घाग आणि जळगाव शाखेचा प्रमुख मिलींद शालिकराव पाटील यांच्यासोबत संगनमत करून हा कट रचला होता. डिसेंबर २०२० ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत जळगावसह राज्यातील विविध शहरांमध्ये मोठमोठे सेमिनार आयोजित करून शेअर मार्केट ट्रेडिंगमधून अल्पावधीत मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवण्यात आले. ‘SEBI’च्या नियमांचे पूर्णपणे उल्लंघन करून ११ महिन्यांच्या बेकायदेशीर गुंतवणूक योजना राबवत, पाळधी येथील भरत रतीलाल पवार यांच्यासह एकूण २७९ गुंतवणूकदारांकडून तब्बल २३.८१ कोटी रुपये उभारण्यात आले. मात्र मुदत संपल्यानंतर ना परतावा मिळाला ना मूळ रक्कम, त्यामुळे हा संपूर्ण निधी अपहार करून विश्वासघात केल्याचे समोर आले.
​या प्रकरणात एक मोठी नाट्यमय घडामोड समोर आली आहे. सुरुवातीला मिलींद पाटील यानेच ‘गुंतवणूकदारांना परतावा मिळत नाही’ असा अर्ज पोलीस अधीक्षकांकडे दिला होता. मात्र पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानंतर आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या सखोल चौकशीत वेगळेच वास्तव उघड झाले.

मिलींद पाटील हाच कंपनीची जळगाव फ्रँचायझी चालवत होता. तोच गुंतवणूकदारांकडून पैसे स्वीकारत होता, करारनामे करून देत होता आणि त्याबदल्यात कंपनीकडून कोट्यवधी रुपयांचे कमिशन लाटत असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी प्रथम त्यालाच अटक केली असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

​भरत पवार यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १६५/२०२६ नोंद करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१८(४), ३१६(२), ३१६(५), ६१(२) तसेच बेकायदेशीर ठेव योजना प्रतिबंध अधिनियम २०१९ (BUDS Act) अंतर्गत कलम २१ व २३ नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य आरोपी समीर आणि नेहा नार्वेकर हे यापूर्वीच ठाण्यातील श्रीनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या तत्सम फसवणुकीच्या गुन्ह्यात २९ जानेवारी २०२६ पासून ठाणे मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त होते. जळगाव आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने न्यायालयीन परवानगी घेऊन २५ मे रोजी त्यांचा ताबा घेतला आणि २६ मे रोजी मध्यरात्री अधिकृत अटक केली. न्यायालयाने दोघांनाही २९ जूनपर्यंत पोलीस रिमांड मंजूर केली आहे. या दाम्पत्याविरुद्ध यवतमाळ, रत्नागिरी, नवी मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, रायगड आणि छत्रपती संभाजीनगर येथे ‘एमपीआयडी’ व ‘बड्स’ कायद्यानुसार अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

​ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित, आर्थिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस उपअधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड आणि त्यांच्या पथकाने केली. दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखेने TWJ असोसिएट्सच्या जळगाव शाखेत गुंतवणूक करून फसवणूक झालेल्या सर्व गुंतवणूकदारांना आपल्या मूळ कागदपत्रांसह तात्काळ आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button