CrimeSocial

ईदच्या पार्श्वभूमीवर जळगाव पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त; आक्षेपार्ह घोषणा, पोस्ट आणि परदेशी झेंड्यांवर बंदी

शांतता समिती व मिरवणूक पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत प्रशासनाचा स्पष्ट इशारा; ५ हजारांहून अधिक प्रतिबंधात्मक कारवाया पूर्ण

ईदच्या पार्श्वभूमीवर जळगाव पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त; आक्षेपार्ह घोषणा, पोस्ट आणि परदेशी झेंड्यांवर बंदी

शांतता समिती व मिरवणूक पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत प्रशासनाचा स्पष्ट इशारा; ५ हजारांहून अधिक प्रतिबंधात्मक कारवाया पूर्ण

जळगाव | प्रतिनिधी : ईद-ए-मिलादसह आगामी ईद उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा पोलिस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी व्यापक तयारी केली आहे. याच अनुषंगाने आज पोलीस मुख्यालयात शांतता समिती सदस्य आणि मिरवणूक पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. जिल्हाधिकारी रोहन घुगे, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, मनपा आयुक्त आदित्य जीवने यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी, प्रशासनातील अधिकारी आणि नागरिक बैठकीला उपस्थित होते.

मिरवणुकीसाठी परवानगी बंधनकारक

बैठकीत मिरवणुकीच्या आयोजनाबाबत प्रशासनाने स्पष्ट सूचना दिल्या. मिरवणुकीसाठी अधिकृत परवानगी घेणे बंधनकारक असून, निश्चित करण्यात आलेल्या मार्गात कोणताही बदल करता येणार नाही. मिरवणुकीदरम्यान आक्षेपार्ह गाणी किंवा घोषणा देऊ नयेत, तसेच सोशल मीडियावर कोणत्याही समाजाच्या भावना दुखावतील अशा पोस्ट, व्हिडिओ अथवा संदेश प्रसारित करू नयेत, असे आवाहन करण्यात आले.

मिरवणुकीत इतर देशांचे झेंडे वापरण्यास बंदी राहणार आहे. तसेच झेंडे फिरवू नयेत, कारण त्यातून वाद निर्माण होण्याची शक्यता असते, अशी सूचना प्रशासनाने केली. मिरवणुकीसाठी स्वयंसेवकांची नियुक्ती करून शिस्त राखण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

वाहतुकीसाठी विशेष नियोजन

मिरवणुकीच्या मार्गावर गर्दी वाढल्यास वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेऊन गरजेनुसार वाहतूक वळविण्यात येणार आहे. नागरिकांना त्रास होऊ नये आणि मिरवणूक सुरळीत पार पडावी, यासाठी पोलीस व महापालिका प्रशासनाकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे.

मागील वर्षीच्या गुन्ह्यांची पुनरावृत्ती टाळण्याचा निर्धार

मागील वर्षी ईदच्या अनुषंगाने जळगाव शहरात ७ गुन्हे दाखल झाले होते. यंदा एकही गुन्हा दाखल होणार नाही, यासाठी सर्वांनी जबाबदारीने सहकार्य करावे, असे आवाहन बैठकीत करण्यात आले. उत्सव शांततेत आणि सामाजिक सलोखा कायम ठेवत साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाने केले.

वीज, रस्ते आणि पाण्याची व्यवस्था

मिरवणुकीच्या मार्गावरील पायाभूत सुविधांबाबतही संबंधित विभागांना सूचना देण्यात आल्या आहेत. महावितरणने ओपन डीपी बंद करणे, विद्युत पुरवठा सुरळीत ठेवणे आणि वायरिंगची योग्य तपासणी करणे, तसेच मनपाने मिरवणूक मार्गावरील अतिक्रमणे हटवून रस्ते स्वच्छ ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.

रस्त्यावरील खड्डे बुजविणे आणि मिरवणूक मार्गावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याबाबतही संबंधित यंत्रणांना निर्देश देण्यात आले आहेत.

ईदसाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त

ईदच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. यामध्ये १ पोलीस अधीक्षक, २ अपर पोलीस अधीक्षक, १० एसडीपीओ, २ प्रोबेशनरी डीवायएसपी, ३० पोलीस निरीक्षक, २०० एपीआय/पीएसआय, ३४०० पोलीस अंमलदार, ८ आरसीपी, १५ स्ट्राइकिंग फोर्स, १६०० होमगार्ड, १०० वाहतूक शाखेचे कर्मचारी आणि २०० एसआरपीएफ कमांडो यांचा समावेश आहे.

याशिवाय २ बीडीडीएस पथके, ४ डॉग युनिट, १५ कंट्रोल रूम मॉनिटरिंग कर्मचारी आणि १५ सोशल मीडिया/सायबर मॉनिटरिंग कर्मचारी तैनात राहणार आहेत.

पोलिसांची तयारी पूर्णत्वाकडे

ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवरही भर दिला आहे. जिल्ह्यातील ५ हजारांहून अधिक प्रतिबंधात्मक कारवाया पूर्ण करण्यात आल्या आहेत. सर्व संबंधित बैठका घेण्यात आल्या असून, संवेदनशील भागात रूट मार्च सुरू आहेत. तसेच दंगल नियंत्रण योजनेची रिहर्सल पूर्ण करण्यात आली आहे.

संबंधित गुन्ह्यांचे दोषारोपपत्र दाखल करण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आली असून, सोशल मीडिया मॉनिटरिंग सतत सुरू ठेवण्यात आले आहे. यंदा मिरवणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे.

डीजेवरही विशेष लक्ष

मिरवणुकीतील डीजेच्या वापराबाबत स्वतंत्र बैठका घेण्यात येत असून, नियमांचे पालन करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. तसेच महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग आणि महापालिका यांच्याशी आवश्यक पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

शांतता व सलोखा कायम ठेवण्याचे आवाहन

बैठकीत प्रशासनाने ईदचा उत्सव शांततेत, उत्साहात आणि सामाजिक सलोखा कायम ठेवत साजरा करण्याचे आवाहन केले. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता संशयास्पद किंवा आक्षेपार्ह बाबी निदर्शनास आल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असेही सांगण्यात आले.

याप्रसंगी जिल्हाधिकारी रोहन घुगे, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, मनपा आयुक्त आदित्य जीवने, निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपायुक्त निर्मला गायकवाड यांच्यासह विविध विभागांचे पोलीस अधिकारी, शांतता समितीचे सदस्य, मिरवणूक पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button