
महा पोलीस न्यूज | चेतन वाणी । जळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध विषारी दारू, हातभट्टी आणि इतर बेकायदेशीर धंद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते शैलेंद्र सपकाळे यांनी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली होती. या निवेदनाची गंभीर दखल घेत राज्य उत्पादन शुल्क विभागाने तातडीने अॅक्शन मोडमध्ये येत २९ आणि ३० मे रोजी जळगाव जिल्ह्यासह सीमावर्ती भागात विशेष मोहीम राबवून मोठी कारवाई केली.
या दोन दिवसांच्या धडक मोहिमेत एकूण ३६ गुन्हे दाखल करण्यात आले असून २२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच २२ हजार ७८० लिटर रसायन नष्ट करण्यात आले असून मोठ्या प्रमाणावर गावठी दारू जप्त करण्यात आली आहे.
सपकाळे यांनी २७ मे रोजी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात जिल्ह्यात अनेक ठिकाणी रसायन मिश्रित हातभट्टी दारूची विक्री सुरू असल्याचा आरोप केला होता. या घातक दारूमुळे गरीब कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होत असून अनेक कुटुंबांनी आपले कर्ते पुरुष गमावल्याचे त्यांनी नमूद केले होते. तसेच गुटखा व इतर अवैध धंद्यांमुळे तरुण पिढी व्यसनाधीन होत असल्याने सामाजिक अस्थिरता वाढत असल्याची चिंताही त्यांनी व्यक्त केली होती.
निवेदनानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक विजय भुकन यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकांनी सलग दोन दिवस विविध ठिकाणी छापेमारी करून अवैध दारू निर्मिती व विक्रीच्या अड्ड्यांवर कारवाई केली. २९ मे रोजी अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, जळगाव कार्यालयाने राबविलेल्या मोहिमेत ९ गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये ८ वारस आणि १ बेवारस गुन्ह्याचा समावेश होता. या कारवाईत ८ आरोपींना अटक करण्यात आली.
हजारो लीटर रसायन नष्ट
कारवाईदरम्यान १७६ लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली. ४,३४० लिटर रसायन नष्ट करण्यात आले. १ लाख ८९ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ३० मे रोजी संयुक्त कारवाईत मोठा साठा उद्ध्वस्त करण्यात आला. दि.३० मे रोजी अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क (जळगाव), डीडीसी एफएस आणि निरीक्षक (येवला) कार्यालयांच्या संयुक्त पथकाने मोठी गुन्हा अन्वेषण मोहीम राबवली. या मोहिमेत २७ गुन्हे दाखल करण्यात आले असून १४ आरोपींना अटक करण्यात आली. या कारवाईत ५७६ लिटर गावठी दारू, ४४ लिटर ताडी, १४.४ लिटर देशी मद्य, १८,४४० लिटर रसायन जप्त अथवा नष्ट करण्यात आले. या कारवाईतील एकूण मुद्देमालाची किंमत ७ लाख ८१ हजार १३० रुपये इतकी आहे.
दोन दिवसांतील कारवाईचा आढावा
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दोन दिवसांच्या विशेष मोहिमेत एकूण ३६ गुन्हे दाखल करून २२ संशयीत आरोपींना अटक करण्यात आली. तसेच २२,७८० लिटर रसायन नष्ट करून ७५२ लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली. एकूण ९ लाख ७० हजार २१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अवैध दारू व्यवसाय आणि रसायनयुक्त हातभट्टीविरोधातील ही कारवाई जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मोहिमांपैकी एक मानली जात असून, अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आले आहेत.






