Other

ना.रक्षा खडसे यांनी इम्फाळ येथे राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या परिसरातील कामांचा आढावा घेत खेळाडूंशी साधला संवाद

ना.रक्षा खडसे यांनी इम्फाळ येथे राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या परिसरातील कामांचा आढावा घेत खेळाडूंशी साधला संवाद

केंद्रीय राज्यमंत्री यांनी सकाळच्या तंदुरुस्ती प्रशिक्षण सत्रात खेळाडूंसोबत सहभाग घेत भारतातील पहिल्या समर्पित क्रीडा विद्यापीठाच्या विकासकामांची केली पाहणी_

इम्फाळ | प्रतिनिधी

केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांनी आज राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ (NSU), इम्फाळ येथे भेट देऊन विद्यापीठाच्या कायमस्वरूपी परिसराच्या प्रगतीचा आढावा घेतला तसेच भारतातील अग्रगण्य क्रीडा शिक्षण संस्थेशी संलग्न खेळाडू, विद्यार्थी, प्रशिक्षक आणि अधिकाऱ्यांशी संवाद साधला. प्रादेशिक क्रीडा परिसंस्थेच्या आढाव्याचा भाग म्हणून त्यांनी भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (SAI) राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्राला (NCOE), इम्फाळ देखील भेट दिली.

या भेटीदरम्यान राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाचे कुलगुरू श्री दलजीत सिंह चौधरी, मणिपूर शासनाच्या क्रीडा विभागाचे सचिव श्री एन. प्रविण सिंह, साईचे प्रादेशिक संचालक श्री सी. धनडापानी, तसेच राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

तसेच आज पहाटे श्रीमती खडसे यांनी खेळाडूंच्या दैनंदिन प्रशिक्षण सत्रात सहभागी होत त्यांच्यासोबत तंदुरुस्ती आणि शारीरिक क्षमता वृद्धिंगत करणाऱ्या उपक्रमांमध्ये सहभाग घेतला. त्यांनी खेळाडू आणि प्रशिक्षकांशी जवळून संवाद साधत वॉर्म-अप ड्रिल्स, सहनशक्ती वाढविणारे प्रशिक्षण, स्ट्रेचिंग व्यायाम, मोबिलिटी रुटीन तसेच विविध क्रीडा प्रकारांशी संबंधित सराव सत्रांचे निरीक्षण केले. खेळाडूंनी दाखविलेल्या शिस्त आणि समर्पणाचे कौतुक करत केंद्रीय राज्यमंत्र्यांनी त्यांना सातत्याने उत्कृष्टतेचा ध्यास घेण्याचे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव उज्ज्वल करण्याचे आवाहन केले.

इम्फाळ पश्चिम जिल्ह्यातील कौत्रुक येथे उभारण्यात येत असलेल्या राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या कायमस्वरूपी परिसराला भेट देऊन श्रीमती खडसे यांनी सुरू असलेल्या बांधकाम आणि पायाभूत सुविधा विकास कामांचा सविस्तर आढावा घेतला. सुमारे ३२५ एकर परिसरात उभारण्यात येणाऱ्या या कॅम्पसचे सुमारे ९५ टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम अंतिम टप्प्यात आहे. केंद्रीय राज्यमंत्र्यांनी प्रशासकीय इमारत, स्मार्ट वर्गखोल्या आणि प्रयोगशाळांनी सुसज्ज शैक्षणिक संकुले, ग्रंथालय, प्रेक्षागृह, क्रीडा विज्ञान सुविधा तसेच सुमारे १,३०० विद्यार्थी आणि ६० प्राध्यापकांसाठी उभारण्यात येणाऱ्या निवासी वसतिगृहांची पाहणी केली.

राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठात विकसित करण्यात येणाऱ्या एकात्मिक शैक्षणिक आणि क्रीडा परिसंस्थेचाही त्यांनी आढावा घेतला. क्रीडा शिक्षण, क्रीडा विज्ञान, प्रशिक्षण, क्रीडा तंत्रज्ञान, खेळाडू विकास आणि संशोधनाला चालना देण्यासाठी विद्यापीठ महत्त्वाची भूमिका बजावेल, असे त्यांनी नमूद केले. भारताची संस्थात्मक क्रीडा चौकट अधिक बळकट करण्यासाठी तसेच जागतिक स्तरावर स्पर्धा करू शकतील असे क्रीडा व्यावसायिक आणि खेळाडू घडविण्यासाठी हे विद्यापीठ परिवर्तनात्मक पाऊल ठरेल, असेही त्यांनी सांगितले.

या प्रसंगी बोलताना श्रीमती खडसे म्हणाल्या की, पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली देशात क्रीडा पायाभूत सुविधा, खेळाडू विकास आणि क्रीडा शिक्षण क्षेत्रात अभूतपूर्व गुंतवणूक होत आहे. राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ हे भारतीय क्रीडाक्षेत्राच्या भविष्यास आकार देणारी, विज्ञान, संशोधन, नवोन्मेष आणि उत्कृष्टतेवर आधारित सक्षम क्रीडा परिसंस्था उभारणारी एक महत्त्वपूर्ण संस्था म्हणून उदयास येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यानंतर केंद्रीय राज्यमंत्र्यांनी साई राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र, इम्फाळ येथे भेट देऊन उच्च दर्जाच्या खेळाडू आणि ईशान्य भारतातील उदयोन्मुख प्रतिभांसाठी उपलब्ध खेळाडू सहाय्य प्रणाली आणि क्रीडा विज्ञान सुविधांचा आढावा घेतला. त्यांनी खेळाडू, प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांशी संवाद साधत फिजिओथेरपी, रिकव्हरी, पोषण, स्पोर्ट्स मेडिसिन, फिजिओलॉजी तसेच स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग सुविधांची पाहणी केली.

ही भेट भारत सरकारच्या क्रीडा शिक्षण, वैज्ञानिक पद्धतीवर आधारित खेळाडू प्रशिक्षण आणि उच्च कार्यक्षमतेच्या क्रीडा परिसंस्था मजबूत करण्याच्या सातत्यपूर्ण वचनबद्धतेचे प्रतीक असल्याचे अधोरेखित झाले. भारताला जागतिक क्रीडा महासत्ता बनविण्याच्या दिशेने हा प्रयत्न महत्त्वाचा असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button