निवडणुकीआधी जळगाव पोलिसांचा मोठा ‘सर्जिकल स्ट्राईक’; दोन सराईत गुन्हेगार थेट जिल्ह्याबाहेर

निवडणुकीआधी जळगाव पोलिसांचा मोठा ‘सर्जिकल स्ट्राईक’; दोन सराईत गुन्हेगार थेट जिल्ह्याबाहेर
सण-उत्सव आणि विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धडक कारवाई
जळगाव : आगामी सण-उत्सव आणि विधान परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर जळगाव पोलीस दलाने गुन्हेगारीविरोधात आक्रमक भूमिका घेत मोठी कारवाई केली आहे. शहरात दहशत निर्माण करणाऱ्या आणि सार्वजनिक शांततेला बाधा आणणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना थेट एक वर्षासाठी जिल्ह्यातून तडीपार करण्यात आल्याने गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी २१ मे २०२६ रोजी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ५६ (१) अंतर्गत हे आदेश जारी केले. आदेशानुसार संबंधित आरोपींना दोन दिवसांच्या आत जळगाव जिल्ह्याची हद्द सोडण्याचे निर्देश देण्यात आले असून पुढील एक वर्ष सक्षम अधिकाऱ्यांच्या लेखी परवानगीशिवाय जिल्ह्यात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.
तडीपार करण्यात आलेल्यांमध्ये राम उर्फ सोनू भगवान सारवान (रा. गुरुनानक नगर, जळगाव) याचा समावेश आहे. त्याच्यावर घरफोडी, जबरी चोरी, दरोडा, घातक शस्त्र बाळगणे तसेच पूर्वीच्या तडीपार आदेशाचे उल्लंघन केल्याचे गंभीर आरोप आहेत. त्याच्याविरोधात १३ हून अधिक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दुसरा आरोपी विशाल मुरलीधर दाभाडे (रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) याच्यावरही गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. शस्त्रांचा धाक दाखवून नागरिकांना धमकावणे, रात्रीच्या वेळी दुकाने आणि घरफोड्या करणे तसेच परिसरात दहशत निर्माण केल्याचे आरोप त्याच्यावर आहेत. वारंवार प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्याच्या वर्तनात सुधारणा होत नसल्याचे पोलिसांनी नमूद केले.
दोन्ही आरोपींना तडीपारीच्या कालावधीत ते वास्तव्यास असलेल्या भागातील स्थानिक पोलीस ठाण्यात दरमहा हजेरी लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास त्यांच्यावर आणखी कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, “कायदा हातात घेणाऱ्या आणि शहरात दहशत निर्माण करणाऱ्या कोणत्याही गुन्हेगाराची गय केली जाणार नाही,” असा थेट इशारा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिला आहे. पोलिसांच्या या धडक मोहिमेमुळे आगामी काळात आणखी काही गुन्हेगारांवर कारवाईची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






