जळगाव शहरासह जिल्ह्यात बकरी ईदचा उत्साह ; सुन्नी ईदगाह मैदानावर ‘ईद-उल-अझहा’ निमित्त नमाज पठाण

जळगाव शहरासह जिल्ह्यात बकरी ईदचा उत्साह ; सुन्नी ईदगाह मैदानावर ‘ईद-उल-अझहा’ निमित्त नमाज पठाण
हजारो मुस्लिम बांधवांची उपस्थिती
जळगाव : मुस्लिम बांधवांचा पवित्र सण ईद उल अझहा (बकरा ईद) निमित्त गुरुवारी सकाळी सुन्नी ईदगाह मैदान, नियाज अली नगर, सुप्रीम कॉलनी येथे विशेष नमाज अदा करण्यात आली. मौलाना जाबीर रजा अमजदी यांच्या नेतृत्वात सकाळी साडेआठ वाजता नमाज पठण पार पडले. यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सुन्नी ईदगाह ट्रस्टचे अध्यक्ष सै. अयाज अली नियाज अली यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ईद साजरी करताना कायद्याच्या चौकटीत राहूनच धार्मिक परंपरा पाळाव्यात, शासनाने परवानगी दिलेल्या पशूंचीच कुरबानी करावी तसेच इतर कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घ्यावी, असे आवाहन केले. स्वच्छता राखून प्रशासनाला सहकार्य करण्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी ट्रस्टच्या मागील वर्षभरातील कार्याचा आढावा घेत भविष्यातील उपक्रमांची माहिती दिली. ईदच्या नमाजासाठी सहकार्य केल्याबद्दल जिल्हा पोलीस प्रशासन, औद्योगिक वसाहत पोलीस ठाणे तसेच जळगाव महानगरपालिकेचे महापौर दीपमाला काळे, आयुक्त, उपायुक्त आणि आरोग्य अधिकारी उदय पाटील यांचे विशेष आभार मानण्यात आले.
खुतबा मौलाना जाबीर रजा अमजदी यांनी सादर केले तर नमाज पठणाची पद्धत मौलाना नजमूल हक यांनी स्पष्ट केली. सलातो सलाम मौलाना उमर खान यांनी सादर केले. यावेळी देशात आणि जगभरात शांतता व स्थैर्य नांदावे, बेरोजगारांना रोजगार मिळावा, आजारी नागरिकांना आरोग्य लाभावे तसेच राष्ट्रीय एकात्मता आणि बंधुभाव वृद्धिंगत व्हावा यासाठी विशेष दुआ करण्यात आली. उपस्थितांनी “आमिन सुम्मा आमिन” म्हणत प्रार्थनेत सहभाग घेतला.
ईदच्या नमाजासाठी सुमारे आठ हजार मुस्लिम बांधव उपस्थित होते. कार्यक्रमास सै. अयाज अली नियाज अली, मौलाना जाबीर रजा अमजदी, मौलाना नजमूल हक, इकबाल वजीर, मुख्तार शाह, कादर मेमन, उमर खान, झरीफ शेख, अफजल मिस्री, नाजीम पेंटर, जमील शेख, सय्यद सगिर, वाहिद खान आदी मान्यवर उपस्थित होते.





