जळगाव एलसीबीची कामगिरी; १२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड, तिघे जेरबंद
१६.३४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम जप्त

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या १२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणत तीन आरोपींना नागपूर येथून अटक केली आहे. आरोपींकडून चोरीस गेलेले सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा सुमारे १६ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात एका नागरिकाने घरफोडीची तक्रार दाखल केली होती. फिर्यादी कुटुंबासह बाहेरगावी गेले असताना अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम लंपास केली होती. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाची जबाबदारी देण्यात आली. त्यानुसार पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.
तपासादरम्यान परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, तांत्रिक विश्लेषण तसेच गुप्त बातमीदारांकडून माहिती संकलित करण्यात आली. या तपासातून संशयित आरोपी नागपूर येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नागपूर गाठून तेथील पोलिसांच्या मदतीने तिघांना ताब्यात घेतले.
सखोल चौकशीत आरोपींनी घरफोडीची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीस गेलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण १६.३४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.
या यशस्वी कारवाईसाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या पथकातील पोलीस उप निरीक्षक शरद बागल, हवालदार गोपाळ गव्हाणे, उमाकांत पाटील, विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, राहुल वानखेडे यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली.






