मिशन RISE’ची जळगाव पोलिसांकडून सुरुवात

‘मिशन RISE’ची जळगाव पोलिसांकडून सुरुवात
महाविद्यालयीन युवा नेतृत्वाच्या माध्यमातून अमली पदार्थमुक्त जळगावचा संकल्प; एमजे कॉलेजपासून अभियानाला प्रारंभ
जळगाव : महाराष्ट्र शासनाच्या “अमली पदार्थमुक्त महाराष्ट्र” या अभियानाला बळ देण्यासाठी जळगाव पोलीस दलाने ‘मिशन RISE’ हा अभिनव जनजागृती उपक्रम सुरू केला आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधून ‘युवा ड्रग्स प्रतिबंधक नेते’ (Student Leaders) तयार करून त्यांच्या माध्यमातून अमली पदार्थांविरोधात जनजागृती करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.
RISE या संकल्पनेचा अर्थ Resist Drugs (अमली पदार्थांना ठाम नकार), Inspire Others (इतरांना प्रेरणा द्या), Support Friends (मित्रांना योग्य वेळी मदत करा) आणि Empower Drug-Free Communities (अमली पदार्थमुक्त समाज घडवा) असा आहे.
महाविद्यालयांमध्ये विविध जनजागृती उपक्रम
या अभियानांतर्गत जळगाव पोलीस दलाने विविध महाविद्यालयांशी समन्वय साधून विद्यार्थी नेत्यांची निवड, मार्गदर्शन, जनजागृती कार्यशाळा, संवाद सत्रे, शपथविधी, रॅली, पोस्टर स्पर्धा तसेच सामाजिक माध्यमांद्वारे जनजागृतीचे नियोजन केले आहे. या विद्यार्थी नेत्यांच्या माध्यमातून अमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जागरूकता निर्माण करण्याबरोबरच व्यसनाधीन व्यक्तींना योग्य मार्गदर्शन आणि मदतीसाठी प्रेरित केले जाणार आहे.
एमजे कॉलेजपासून अभियानाची सुरुवात
‘मिशन RISE’ची सुरुवात ७ ऑगस्टपासून एमजे महाविद्यालयातून करण्यात येणार असून, अभियानात सहभागी होणाऱ्या सर्व युवा नेत्यांना विशेष ‘मिशन RISE’ बॅज देण्यात येणार आहेत. भविष्यात जिल्ह्यातील प्रत्येक महाविद्यालयात व्यसनमुक्तीचे युवा नेतृत्व तयार करण्याचा जळगाव पोलिसांचा संकल्प आहे.
आयजीपी संजय येनपुरे यांच्या हस्ते पोस्टर्सचे अनावरण
या अभियानासाठी तयार करण्यात आलेल्या ‘मिशन RISE’ पोस्टर्सचे उद्घाटन नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक (IGP) संजय येनपुरे यांच्या हस्ते करण्यात आले.
सामूहिक सहभागाचे आवाहन
«”अमली पदार्थांविरुद्धची लढाई ही केवळ पोलिसांची जबाबदारी नसून संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. पालक, शिक्षक, विद्यार्थी, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी सक्रिय सहभाग घेऊन ‘Together for a Drug-Free Jalgaon’ हे ध्येय साकार करावे.”
— जळगाव पोलीस दल»







