Other

दिवाळी पाडव्याला महात्मा गांधी उद्यानात रंगणार ‘पाडवा पहाट’ची संगीत मैफल

आकाशवाणी जळगावच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजन; अभंगवाणी, नाट्यगीते आणि सुगम संगीताची मेजवानी

दिवाळी पाडव्याला महात्मा गांधी उद्यानात रंगणार ‘पाडवा पहाट’ची संगीत मैफल

आकाशवाणी जळगावच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजन; अभंगवाणी, नाट्यगीते आणि सुगम संगीताची मेजवानी

जळगाव, प्रतिनिधी : दिवाळी पाडवा अर्थात बलिप्रतिपदेच्या मंगलमय पर्वावर मंगळवार, १० नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजता महात्मा गांधी उद्यानात ‘पाडवा पहाट’ या प्रातःकालीन संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. आकाशवाणी जळगावच्या ५० व्या आणि स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानच्या २५ व्या वर्षपूर्तीनिमित्त या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

आकाशवाणी जळगाव, चांदोरकर प्रतिष्ठान आणि कै. नथ्थूशेट चांदसरकर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या मैफिलीत अभंगवाणी, नाट्यगीते आणि सुगम संगीताचा सुरेल आविष्कार अनुभवता येणार आहे. नाशिक येथील आकाशवाणी जळगावचे मान्यताप्राप्त कलाकार या मैफिलीचे सादरीकरण करणार आहेत.

कलाकारांची सुरेल साथ

या कार्यक्रमात आशिष रानडे, ईश्वरी दसक्कर कदडी आणि पूजा दसक्कर गायन सादर करणार आहेत. त्यांना तबल्यावर सुजित काळे, संवादिनीवर सुभाष दसक्कर, सिंथेसायझरवर विजय नेवे आणि ऑक्टोपॅडवर नितेश पाटील साथसंगत करणार आहेत. उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन दीपिका घैसास करणार आहेत.

मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमाला खासदार स्मिताताई वाघ, आमदार राजूमामा भोळे, महापौर दीपमाला काळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, आकाशवाणी जळगावचे कार्यक्रम प्रमुख ज्ञानेश्वर बोबडे, उद्योगपती अशोकभाऊ जैन आणि कै. नथ्थूशेट चांदसरकर ट्रस्टचे मेजर नानासाहेब वाणी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

भवरलाल अँड कांताबाई फाउंडेशनचे या कार्यक्रमाला सहकार्य लाभले आहे. ही मैफल आकाशवाणी जळगाववरून प्रसारित होणार असल्याने कार्यक्रम सकाळी ठीक ६ वाजता सुरू होणार आहे. रसिकांनी कार्यक्रम सुरू होण्याच्या किमान १० मिनिटे आधी आसनस्थ व्हावे आणि या सुरेल मैफिलीचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button