जिल्ह्यात ‘झिरो टॉलरेंस’ मोहिमेचा धडाका!
हातभट्टी, सट्टा अड्ड्यांवर पोलिसांच्या धाडी; जप्त साहित्य भरचौकात जाळून दिला कडक इशारा

जिल्ह्यात ‘झिरो टॉलरेंस’ मोहिमेचा धडाका!
हातभट्टी, सट्टा अड्ड्यांवर पोलिसांच्या धाडी; जप्त साहित्य भरचौकात जाळून दिला कडक इशारा
जळगाव : जिल्हा पोलीस दलाकडून गुन्हेगारीविरोधातील कारवाया अधिक तीव्र करण्यात आल्या असून सोमवारी पहाटेपासून संपूर्ण जिल्ह्यात ‘झिरो टॉलरेंस’ मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत हातभट्टी, अवैध दारू विक्री अड्डे आणि सट्टा पेढ्यांवर एकाचवेळी धाडी टाकून मोठी कारवाई करण्यात आली.
सार्वजनिकरित्या साहित्याचा नाश
कारवाईनंतर पोलिसांनी जप्त केलेले साहित्य केवळ पोलीस ठाण्यात न ठेवता भरचौकात आणि ग्रामस्थांसमोर नष्ट केले. सट्टा अड्ड्यांवरून जप्त कागदपत्रे, खोके आणि इतर साहित्य सार्वजनिक ठिकाणी जाळण्यात आले. त्यामुळे अवैध व्यवसायांना आता कोणतीही माफी मिळणार नाही, असा स्पष्ट संदेश पोलिसांनी दिला.
धिवरे यांच्या नेतृत्वाखाली आक्रमक मोहीम
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी विविध मोहिमा सुरू केल्या आहेत. नाकाबंदी, अवैध धंद्यांवरील कारवाया आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाईमुळे पोलिसांची उपस्थिती अधिक प्रभावी होत असल्याचे दिसून येत आहे.
गावासमोर हातभट्ट्यांचा नाश
दारूबंदी कायद्यांतर्गत जप्त करण्यात आलेली हातभट्टीची दारू व रसायने संबंधित गावांमध्ये नागरिकांसमोर नष्ट करण्यात आली. तरुणांनी व्यसनांपासून दूर राहावे आणि समाजात सकारात्मक संदेश जावा, या उद्देशाने पोलिसांनी ही भूमिका घेतल्याचे सांगण्यात आले.
गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण
पोलिसांच्या या धाडसी कारवाईमुळे अवैध धंदे चालकांमध्ये धडकी भरली आहे. सार्वजनिकरित्या साहित्य जाळल्याने गुन्हेगारी प्रवृत्तींवर मानसिक दबाव निर्माण झाला असून सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे.
जनतेतून पोलिसांचे कौतुक
नागरिकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या मोहिमेमुळे प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.






