जळगाव पोलिसांची विशेष मोहीम : शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी चालकांची ब्रेथ अॅनालायझरद्वारे अचानक तपासणी

जळगाव पोलिसांची विशेष मोहीम : शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी चालकांची ब्रेथ अॅनालायझरद्वारे अचानक तपासणी
जळगाव : शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी जळगाव पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत शाळा बस चालक तसेच विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांची ब्रेथ अॅनालायझरद्वारे अचानक मद्यपान तपासणी केली जात आहे.
विद्यार्थ्यांचा प्रवास पूर्णपणे सुरक्षित व्हावा, तसेच अपघात टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात, या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. चालकांकडून कोणत्याही प्रकारचे मद्यपान करून वाहन चालवले जाणार नाही, याची खात्री करण्यासाठी पोलिसांकडून ठिकठिकाणी औचक तपासण्या करण्यात येत आहेत.
हा उपक्रम केवळ कायद्याची अंमलबजावणी नसून विद्यार्थ्यांच्या सुरक्षित भविष्याचा विचार करून राबविण्यात आलेली संवेदनशील आणि दूरदृष्टीची पाऊल आहे. पालकांना आपल्या मुलांच्या सुरक्षित प्रवासाबाबत विश्वास निर्माण व्हावा, विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षिततेची जाणीव निर्माण व्हावी आणि चालकांमध्ये जबाबदारीची भावना अधिक दृढ व्हावी, हा या मोहिमेचा मुख्य हेतू आहे.
जळगाव पोलिसांचे हे कार्य समाजाभिमुख आणि प्रतिबंधात्मक पोलीसिंगचे उत्तम उदाहरण मानले जात आहे. अपघात झाल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा अपघात होण्यापूर्वीच दक्षता घेणे ही प्रभावी पोलिसी भूमिका असल्याचे या उपक्रमातून स्पष्ट होते.






