
जळगाव जिल्ह्यात इंधनाचा मुबलक साठा -जिल्हाधिकारी रोहन घुगे
…तर अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई; जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडून पेट्रोल पंपांची पाहणी
जळगाव: प्रतिनिधी शहरातील काही पेट्रोल पंपांवर इंधन संपल्याच्या अफवा सोशल मीडियावर वेगाने पसरल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने पावले उचलली आहेत. “जळगाव जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा मुबलक साठा उपलब्ध असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये,” असे जाहीर आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जिल्हाधिकारी रोहन घुगे आणि पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, जिल्हा पुरवठा अधिकारी आणि पेट्रोल-डिझेल पुरवठादारांची संयुक्त व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तातडीची बैठक घेतली. या बैठकीत जिल्ह्यातील इंधनसाठा आणि पुरवठा व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
अफवांमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची प्रत्यक्ष खात्री करण्यासाठी जिल्हाधिकारी रोहन घुगे आणि पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्वतः शहरातील विविध पेट्रोल पंपांना भेटी दिल्या. त्यांनी पंपांवरील इंधनसाठा, पुरवठा साखळी आणि नागरिकांच्या गर्दीची प्रत्यक्ष पाहणी करून यंत्रणेला आवश्यक सूचना दिल्या.
जिल्ह्यात कुठेही इंधनाची कमतरता नाही. सर्व ३७१ पेट्रोल पंपांवर पुरेसा साठा उपलब्ध आहे. काही ठिकाणी तात्पुरती टंचाई निर्माण झाली होती, तिथेही तातडीने नवा साठा पोहोचवण्यात आला असून अतिरिक्त साठा ट्रान्झिटमध्ये (असल्याची माहिती जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिली.
नागरिकांना काही तक्रार किंवा शंका असल्यास ०२५७-२२२३१८० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे तसेच dsojalgaon1@gmail.com या ई-मेलवर माहिती देण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.





