नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर आमदार राजूमामा भोळे; पंचनामे व भरीव मदतीसाठी शासनाकडे पाठपुरावा करणार


नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर आमदार राजूमामा भोळे; पंचनामे व भरीव मदतीसाठी शासनाकडे पाठपुरावा करणार
जळगाव शहरातील शेतशिवारांची प्रत्यक्ष पाहणी; कोरडा दुष्काळ जाहीर करण्याचीही मागणी
जळगाव, : जळगाव शहरातील शेतकऱ्यांच्या पिकांचे पावसाअभावी झालेल्या नुकसानीची आमदार सुरेश दामु भोळे (राजूमामा) यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी व भावना जाणून घेतल्या. तसेच संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन प्रत्यक्ष शेतातील परिस्थितीची पाहणी केली.
यावेळी बोलताना आमदार राजूमामा भोळे म्हणाले की, “आज शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष पाहणी करताना परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे दिसून येत आहे.
सोयाबीनसह विविध पिके सुकून गेली असून, पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या हातात उत्पन्न राहिलेले नाही. शेतकऱ्यांनी आपल्या घरातील उपलब्ध पैसा शेतीत खर्च केला; मात्र आता पिके वाया जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे.”
शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून त्यांना भरीव नुकसानभरपाई मिळावी, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या असून, याबाबत मुख्यमंत्री, कृषिमंत्री तसेच संबंधित विभागांकडे पत्रव्यवहार करून सातत्याने पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे आमदारांनी सांगितले.
मागील काळात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह वीजबिलाच्या प्रश्नावर शासनाने निर्णय घेतले असून, शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत शासनस्तरावर पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करून जळगाव शहरासह संबंधित नुकसानग्रस्त भागात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शासनाकडे करण्यात येणार असल्याचे आमदार भोळे यांनी सांगितले. यासाठी शासनाने नियुक्त केलेल्या समितीमार्फत परिस्थितीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांच्या नुकसानीचा योग्य विचार करण्यात यावा, अशी मागणीही करण्यात येणार आहे.
ते म्हणाले, “दुष्काळाची परिस्थिती केवळ कागदावर किंवा निकषांवर न पाहता प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणे आवश्यक आहे. एखाद्या शेतकऱ्याच्या विहिरीत थोडेफार पाणी उपलब्ध असल्यामुळे त्याचे पीक चांगले आहे, असे गृहीत धरून त्याला मदतीपासून वंचित ठेवू नये. प्रत्यक्ष नुकसान झालेल्या शंभर टक्के शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी शासनाकडे आग्रही मागणी करण्यात येईल.”
शेतकऱ्यांच्या भावना प्रत्यक्ष जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे असून, “निसर्ग आपल्या हातात नाही; मात्र संकटाच्या काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील. शेतकऱ्यांची नाराजी व चिंता दूर करण्यासाठी शासनस्तरावर आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने प्रयत्न करू,” असे आमदार राजूमामा भोळे यांनी स्पष्ट केले.
यावेळी पाहणीदरम्यानच मुख्यमंत्री व कृषिमंत्री यांच्याकडे परिस्थिती मांडण्यासाठी आवश्यक प्रयत्न करणार असून नुकसानग्रस्त एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी पंचनाम्यांपासून प्रत्यक्ष मदत मिळेपर्यंत सातत्याने पाठपुरावा करण्याची भूमिका आमदारांनी व्यक्त केली.
— आमदार सुरेश दामु भोळे (राजूमामा) कार्यालय, जळगाव







